Ashish Verma Wedding Photos : ‘अतरंगी रे’ आणि ‘आर्टिकल 15’ सारख्या चित्रपटात विविध भूमिका साकारणारा बॉलीवूड अभिनेता आशिष वर्माने लग्नगाठ बांधली आहे. आशिषने त्याची गर्लफ्रेंड रोंजिनी चक्रवर्तीशी लग्न केलं आहे. त्याने लग्नाच्या १४ दिवसांनी फोटो शेअर करून ही आनंदाची बातमी दिली आहे.

आशिष वर्माने अभिनेत्री व मॉडेल रोंजिनी चक्रवर्तीबरोबर पारंपरिक पद्धतीने लग्न केलं नाही. या दोघांनी अत्यंत साधेपणाने नोंदणी पद्धतीने लग्नगाठ बांधली. २ एप्रिल २०२५ रोजी दोघांनी मुंबईत साधेपणाने विवाह केला आणि आता १४ दिवसांनंतर या जोडप्याने सोशल मीडियावर त्यांच्या लग्नाचे फोटो शेअर करून चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला.

या जोडप्याने इन्स्टाग्रामवर त्यांच्या लग्नातील काही सुंदर फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये त्यांची केमिस्ट्री स्पष्टपणे दिसत आहे. एका फोटोमध्ये आशिष रोंजिनीच्या गालावर प्रेमाने किस करताना दिसत आहे, तर दुसऱ्या फोटोत दोघेही रजिस्ट्रार ऑफिसमध्ये कागदपत्रांवर सही करताना दिसत होते.

पाहा पोस्ट-

लग्नात आशिषने पांढऱ्या रंगाचा कुर्ता-पायजामा घातला होता, तर रोंजिनी लाल साडीत खूपच सुंदर दिसत होती. त्याने लग्नाचे फोटो पोस्ट करून तारीख सांगितली आहे. आशिषने लग्नाची बातमी दिल्यावर सेलिब्रिटी व चाहते या दोघांचं अभिनंदन करत आहेत.

आशिष आणि रोंजिनी गेल्या अनेक वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते. ‘आर्टिकल 15’ चित्रपटाच्या सेटवर हे दोघे भेटले होते आणि तिथून सुरू झालेलं हे नातं आता लग्नापर्यंत पोहोचलं. दोघांनी अतिशय खासगी पद्धतीने लग्न केलं. या लग्नात फक्त दोघांचे जवळचे मित्र आणि कुटुंबीय उपस्थित होते. दोघांनी आता नवीन आयुष्याची सुरुवात केली आहे.

आशिष वर्माचे करिअर

आशिष वर्माने आतापर्यंत अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. त्याने ‘अतरंगी रे’, ‘तेरी बातो में ऐसा उल्झा जिया’, ‘हेल्मेट’ आणि ‘सुई धागा’ यांसारख्या चित्रपटांमध्ये विविध भूमिका साकारल्या आहेत. तर रोंजिनी ‘तुंबाड’, ‘सिम्बा’, ‘मेड इन हेवन’ आणि ‘फ्रॉम सिडनी विथ लव्ह’ सारख्या अनेक लोकप्रिय चित्रपट आणि वेब सीरिजमध्ये दिसली आहे.