गेल्या काही वर्षांमध्ये बॉलीवूडमध्ये अनेक ऐतिहासिक आणि पौराणिक चित्रपट प्रदर्शित झाले. यातील काही चित्रपटांना प्रेक्षकांनी खूप चांगला प्रतिसाद दिला तर काहींकडे पाठ फिरवली. ‘आदिपुरुष’नंतर आता दिग्दर्शक नितेश तिवारी आता करत असलेल्या ‘रामायण’ या चित्रपटाची सर्वत्र चर्चा आहे. या चित्रपटात रणबीर कपूर प्रभू श्रीराम यांच्या भूमिकेत तर ‘केजीएफ’स्टार यश हा ‘रावण’ म्हणून दिसणार आहे.
आधी या चित्रपटात सीतेच्या भूमिकेसाठी सर्वप्रथम आलिया भट्टच नाव समोर आलं होतं. परंतु काही कारणास्तव आलिया ऐवजी या भूमिकेत दाक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवी दिसणार असल्याचं स्पष्ट झालं. मध्यंतरी या चित्रपटात सनी देओल हा हनुमानाच्या भूमिकेत दिसण्याची शक्यताही वर्तवण्यात आली. या चित्रपटात रणबीरची प्रभू श्रीराम यांच्या भूमिकेत निवड झाल्याने बऱ्याच लोकांच्या भुवया उंचावल्या. बऱ्याच लोकांनी रणबीरवर टीकाही केली. आता मात्र रामानंद संगार यांच्या भूमिकेत प्रभू श्रीराम यांची भूमिका निभावणाऱ्या अरुण गोविल यांनीही यावर भाष्य केलं आहे.
आणखी वाचा : शाहरुखचा ‘बाजीगर’ पुन्हा होणार मोठ्या पडद्यावर प्रदर्शित; ३० वर्षांनी पुन्हा झळकला हाऊसफूल्लचा बोर्ड
अरुण गोविल यांच्यामते या भूमिकेसाठी रणबीरची निवड ही योग्य आहे अन् याबद्दलच त्यांनी भाष्य केलं आहे. ‘बॉलिवूड स्पाय’शी संवाद साधताना अरुण गोविल म्हणाले, “रणबीर ही भूमिक निभावू शकेल की नाही ते येणारी वेळच ठरवेल. आधीपासूनच आपण काही सांगू शकत नाही, पण रणबीरबद्दल बोलायचं झालं तर तो एक उत्कृष्ट कलावंत आहे. मी जितकं त्याला ओळखतो तो फार मेहनत घेऊन एखादी भूमिका साकारतो. तो एक संस्कारी मुलगा आहे. नैतिकता, संस्कृतीसारख्या बऱ्याच गोष्टी त्याच्या व्यक्तीमत्त्वात आढळून येतात. मला खात्री आहे की तो या चित्रपटात त्याचा सर्वश्रेष्ठ परफॉर्मन्स देईल.”
मीडिया रीपोर्टनुसार रणबीर कपूर व यश या चित्रपटाच्या तयारीत व्यस्त आहेत. तर यात हनुमानाच्या भूमिकेत सनी देओल दिसणार आहे या गोष्टीचीही पुष्टी झालेली आहे. अद्याप चित्रपटाचं प्री-प्रोडक्शन काम सुरू असून मार्च मध्ये याच्या चित्रीकरणाला सुरुवात होणार आहे. हा चित्रपट २०२५ च्या दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित करण्याचा अंदाज निर्मात्यांनी वर्तवला आहे.