मागील काही दिवसांपासून राज बब्बर यांच्या कुटुंबात सगळं आलबेल नसल्याचं दिसून येत आहे. राज बब्बर व दिवंगत स्मिता पाटील यांचा मुलगा प्रतीकने दोन महिन्यांपूर्वी दुसरं लग्न केलं, पण लग्नात त्याने बब्बर कुटुंबातील कोणत्याही सदस्याला बोलावलं नव्हतं. इतकंच नाही तर प्रतीकने वडिलांचं नाव हटवलं आहे. त्याने त्याचं नाव ‘प्रतीक राज बब्बर’ बदलून आता ‘प्रतीक स्मिता पाटील’ असं केलं आहे. याचदरम्यान प्रतीकच्या सावत्र भावाच्या इन्स्टाग्राम पोस्टने लक्ष वेधले आहे.
राज बब्बर यांनी पहिलं लग्न नादिराशी केलं होतं. नादिरापासून त्यांना जुही बब्बर व आर्य बब्बर ही अपत्ये आहेत. जुही व आर्य दोघेही अभिनयक्षेत्रात आहेत. आर्यने चित्रपट व मालिकांमध्ये काम केलंय, तर जुही हिंदी नाटकांसाठी ओळखली जाते. प्रतीक हा राज बब्बर व स्मिता पाटील यांचा मुलगा आहे. स्मिता यांच्या निधनानंतर प्रतीकला बब्बर कुटुंबाने स्वीकारलं. जुही प्रतीकला राखी बांधते, तसेच अनेकदा ती व आर्य प्रतीकबरोबरचे फोटो पोस्ट करत असते. मात्र मागील काही दिवसांपासून प्रतीक व बब्बर कुटुंबात दुरावा आला आहे.
प्रतीक बब्बरने १४ फेब्रुवारी २०२५ रोची गर्लफ्रेंड प्रिया बॅनर्जीशी दुसरं लग्न केलं. या लग्नाला त्याने वडील राज बब्बर तसेच सावत्र भावंडांना निमंत्रित केलं नव्हतं. प्रियाचे कुटुंबीय व स्मिता पाटील यांच्या माहेरची मंडळी यांनी लग्नाला हजेरी लावली होती. प्रतीकने वडिलांना लग्नात न बोलवून स्मिता पाटील यांना दुखावलं आहे असं आर्य म्हणाला होता. लग्नानंतर दिलेल्या एका मुलाखतीत प्रतीकने आपल्याला वडिलांसारखं व्हायचं नसून आईसारखं व्हायचंय, त्यामुळे नाव बदलल्याचं विधान केलं. इतकंच नाही तर बब्बर कुटुंबाशी ताणलेल्या संबंधांबद्दल योग्य वेळ आल्यावर बोलणार असल्याचंही तो म्हणाला होता. या सगळ्यांदरम्यान आर्य बब्बरने प्रतीकबरोबरचा फोटो पोस्ट केला आहे.
आर्य बब्बरची पोस्ट नेमकी काय?
आर्य बब्बरने गुरुवारी वर्ल्ड सिबलिंग्स डे (जागतिक भावंडं दिन) निमित्त बहीण जुही व सावत्र भाऊ प्रतीक यांच्याबरोबरचा फोटो पोस्ट केला. ‘अपने तो अपने होते है’ असं कॅप्शन त्याने या फोटोला दिलं आहे. तसेच ‘उखाड लो जो उखाडना है’ असंही त्याने लिहिलं आहे.
आर्यच्या या पोस्टवर त्याच्या पत्नीने कमेंट केली आहे. तसेच इतर अनेकांनी रेड हार्ट इमोजी कमेंट केल्या आहेत. दरम्यान, प्रतीक व आर्य एकमेकांना इन्स्टाग्रामवर फॉलो करत नाहीत.