आपल्या सुमधूर आवाजाने गेली वर्षानुवर्षे लाखो चाहत्यांचं मन जिंकणाऱ्या आशा भोसले आज वयाच्या ९० व्या वर्षीही गायनाचे कार्यक्रम करतात. मराठीसह बॉलीवूड कलाविश्वातील अनेक सुपरहिट गाणी त्यांच्या आवाजात संगीतबद्ध करण्यात आली आहेत. गायनाशिवाय अनेकदा कित्येक सामाजिक विषयांवर त्या स्पष्ट मत मांडत असतात.नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात आशा भोसले यांनी आजच्या पिढीतील नात्यांबाबत आपलं मत व्यक्त केले आहे.या कार्यक्रमात आशा भोसले यांनी आजच्या पिढीतील स्त्रिया आणि मुलं होऊ देण्याबाबत असणारे विचार यावर मत व्यक्त केलं आहे असं. त्या म्हणाल्या की, आजच्या पिढीतील महिलांना मुलांचं संगोपन करणं हे ओझं वाटतं.

याच कार्यक्रमात त्यांनी श्री श्री रविशंकरजींना आजच्या पिढीत वाढलेलं घटस्फोटाचं प्रमाण, त्यामागची कारण काय आहेत, असा प्रश्न विचारत याबाबत चिंता व्यक्त केली आहे. तसेच, आजच्या पिढीतील महिलांना मुलांना जन्म देणं आणि त्यांचं संगोपन करणं हे ओझं का वाटतं, असाही प्रश्न त्यांनी श्री श्री रविशंकरजींना विचारला. हा प्रश्न विचारताना आशा भोसले यांनी स्वतःच्या आयुष्यातील उदाहरण दिलं.

हेही वाचा…“माझे पतीबरोबर भांडण व्हायचे तेव्हा मी…”, आशा भोसलेंनी स्वतःचे उदाहरण देत घटस्फोटांबाबत व्यक्त केली चिंता; म्हणाल्या, “आजच्या पिढीमध्ये…”

काय म्हणाल्या आशा भोसले?

आशा भोसले म्हणाल्या, “आजच्या पिढीतील महिलांना मुलांना जन्म देऊन त्यांचं संगोपन करणं हे ओझं वाटतं. आपण गरीब घरांमध्ये हा प्रकार समजू शकतो, पण मध्यमवर्गीय आणि उच्चवर्गीय कुटुंबांमध्येही असे प्रकार दिसत आहेत. मी वयाच्या १० व्या वर्षी पार्श्वगायन सुरू केलं. पुढे माझं लग्न झालं, मला तीन मुलं झाली, मी त्यांना वाढवलं, त्यांचं लग्न केलं, आणि आता माझी नातवंडं आहेत. मी माझ्या पतीशिवाय सर्व जबाबदाऱ्या यशस्वीपणे आणि एकटीने पार पाडल्या.”

आशा भोसले पुढे म्हणाल्या, “मी त्या काळात रात्रंदिवस काम करत असतानाही मुलांचं संगोपन केलं. अनेक व्यापांत व्यग्र असतानाही मी माझ्या मुलांची, त्यांच्या अभ्यासाची काळजी घेतली. जर मी हे करू शकते, तर आजच्या स्त्रियांना असं का वाटतं की त्या मुलांचं संगोपन करून सगळं काही करू शकत नाहीत?”

हेही वाचा…‘लापता लेडीज’ ऑस्करला गेल्यावर मराठमोळ्या छाया कदम म्हणाल्या, “मी आनंदी, पण…”

आशा भोसले यांच्या या प्रश्नावर श्री श्री रविशंकरजी म्हणाले, “कारण आजच्या स्त्रियांना तुमचं आयुष्य माहीत नाहीये. तुम्ही संसार आणि काम दोन्ही सांभाळून एक आदर्श निर्माण केला आहे.” आशा भोसले या सध्या ९१ वर्षांच्या असून त्या या वयातही गाणी गातात अगदी जिमलाही जातात, असं कार्यक्रमात श्री श्री रविशंकरजींनी सांगितलं.