आशा भोसले ९०व्या वर्षीही व्यासपीठावर गाणी म्हणत आपल्या गोड आवाजाने श्रोत्यांना मंत्रमुग्ध करतात. नुकत्याच एका कार्यक्रमानिमित्त त्या व्यासपीठावर होत्या, त्यावेळी त्यांच्या हातात माईक होता; मात्र त्या गात नव्हत्या. तर त्या कार्यक्रमात त्यांनी सध्याच्या पिढीचे न टिकणारे लग्नं आणि काहीच दिवसांत होणारे घटस्फोट यावर चिंता व्यक्त करत नव्या पिढीवर टीका केली. या कार्यक्रमात आध्यात्मिक गुरु श्री श्री रवी शंकरसुद्धा उपस्थित होते.
आशा भोसले यांनी श्री श्री रवी शंकर यांना विचारले की, आजकालचे तरुण जोडपे मोठ्या प्रमाणावर सहजपणे लग्न का मोडतात? हाच प्रश्न विचारताना आशाताईंनी त्यांच्या वैवाहिक आयुष्यावर प्रकाश टाकला. त्यांचेही पतीबरोबर खटके उडायचे, परंतु त्यांनी यातून कसा मार्ग काढला हे सांगितले.
हेही वाचा…‘लापता लेडीज’ ऑस्करला गेल्यावर मराठमोळ्या छाया कदम म्हणाल्या, “मी आनंदी, पण…”
आशा भोसले म्हणाल्या, “माझे माझ्या पतीबरोबर भांडण झाले की मी फारफार तर माझ्या मुलांना घेऊन माहेरी जायचे. परंतु, मी कधीही एका क्षणात घटस्फोटाचा निर्णय घेतला नाही. आजची पिढी प्रत्येक महिन्यात एकमेकांना घटस्फोटाची कागदपत्रे पाठवते, असं मी ऐकलं आहे. असं का होतं, हा प्रश्न मी श्री श्री रविशंकरजी यांना विचारला.” यावर ते म्हणाले, “आशाजी, आजच्या पिढीमध्ये फार कमी लोकांकडे तुमच्याजवळ होती तशी सहनशक्ती आहे. तुमच्याकडे संकटांना सामोरं जाण्याचं धैर्य आणि सामर्थ्य होतं, जी सहनशक्ती आजकालच्या पिढीमध्ये कमी आहे; त्यामुळेच घटस्फोटाचे प्रमाण वाढले आहे.”
आजची पिढी नात्यात एकमेकांना लवकर कंटाळते
आशा भोसले पुढे म्हणाल्या, “मी माझ्या आयुष्यातील अनेक वर्षे सिनेसृष्टीत घालवली आहेत. या काळात मी अनेक जोडप्यांना पाहिलं आहे, तेव्हा ते आजच्या पिढीसारखे अल्पकाळात घटस्फोटाचे निर्णय घेत नसत. मला असं वाटतं की, आजच्या पिढीमध्ये आपल्या साथीदारांविषयीचं प्रेम फार लवकर कमी होतं. ते लवकर बोअर (कंटाळतात) होतात. हेच आजच्या पिढीमध्ये लवकर घटस्फोट होण्याचं कारण आहे.”
आशाताईंचं वैवाहिक आयुष्य
आशा भोसले यांनी वयाच्या १६ व्या वर्षी, ३१ वर्षीय गणपतराव भोसले यांच्याबरोबर कुटुंबाच्या इच्छेविरुद्ध विवाह केला होता. या जोडप्याला तीन मुले होती आणि १९६० मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. नंतर आशा भोसले यांनी १९८० मध्ये संगीत दिग्दर्शक आर. डी. बर्मन यांच्याशी लग्न केले आणि १९९४ मध्ये बर्मन यांच्या मृत्यूपर्यंत ते एकत्र राहिले.