करण जोहरच्या ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटाची गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरु आहे. या चित्रपटाला अनपेक्षितपणे प्रेक्षकांनी उत्तम प्रतिसाद दिला. या चित्रपटाची कथा, रणवीर -आलियाची जोडी ते धर्मेंद्र आणि शबाना आजमी यांची केमिस्ट्री सगळंच लोकांना पसंत पडलं. याबरोबरच यातील गाणीही चांगलीच हिट झाली. त्यापैकी ‘व्हॉट झुमका’ हे गाणं तर सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.
६० च्या दशकातील ‘मेरा साया’ चित्रपटातील ‘झुमका गिरा रे’ या गाण्याचं हे रिमेक व्हर्जन सध्या सगळ्यांच्याच तोंडी ऐकायला मिळत आहे. चित्रपटातील हे गाणं जेव्हा प्रदर्शित झालं तेव्हासुद्धा यावर बऱ्याच लोकांनी टीका केली होती. आता ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनीदेखील या गाण्यावर आणि एकूणच या रिमेक संकल्पनेवर भाष्य केलं आहे.
आणखी वाचा : हॉट लाल साडीमध्ये श्रेया धन्वंतरीचा ग्लॅमरस लूक; ‘गन्स अँड गुलाब्स’ या सीरिजमुळे अभिनेत्री चर्चेत
‘इंडिया टूडे’शी संवाद साधताना आशा भोसले म्हणाल्या, “जर सध्याच्या संगीतकारांमध्ये आणि गायकांमध्ये नवीन काहीतरी लोकांपुढे सादर करायची क्षमता किंवा कुवत असती तर त्यांना या जुन्या गाण्यांच्या रिमेक करायची गरजच पडली नसती.” हे सांगताना आशा भोसले यांनी ‘व्हॉट झुमका’ या गाण्याचे उदाहरण दिले. त्या म्हणाल्या, “हे गाणं १९६६ च्या ‘मेरा साया’मधील असून ते साधना यांच्यावर चित्रित झाले. याला संगीत मदन मोहन यांनी दिलं आणि राजा मेहंदी अली खान यांनी हे गाणं लिहिलं होतं.”
आशाजी म्हणाल्या, “गीतकार, संगीतकार आणि गायक यांच्या एकत्रित मेहनतीमधून हे गाणं तयार झालं आहे. इतकंच नव्हे तर चित्रपटाच्या दिग्दर्शकाचासुद्धा त्यात तितकाच मोठा वाटा आहे. अशी उत्तम गाणी तयार करण्यासाठी या कलाकारांनी प्रचंड मेहनत घेतली आहे. गीतकार आणि संगीतकार गाण्याच्या प्रत्येक शब्दावर गहन चर्चा करायचे. सध्या मात्र चांगलं काव्य असलेली गाणी ही क्वचितच ऐकायला मिळतात.”