आशा भोसले यांनी त्यांच्या मधुर आवाजाने श्रोत्यांच्या मनात विशेष स्थान निर्माण केले आहे. त्या आजही विविध कॉन्सर्टमध्ये गात प्रेक्षकांचे मनोरंजन करतात. केवळ भारतातच नाही तर जगभरात आशा भोसले या ९१ व्या वर्षीही परफॉर्मन्स करत आहेत. नुकत्याच झालेल्या दुबईतील कॉन्सर्टमध्ये या दिग्गज गायिकेने गायन तर केलेच पण, तरुणाईमध्ये लोकप्रिय ठरलेल्या नवीन ट्रेंडलाही फॉलो करून दाखवले. त्यांनी विकी कौशलचे ‘तौबा तौबा’ हे गाणे गात त्यावर ठेका धरला.
आशा भोसले यांचा दुबईतील परफॉर्मन्सचा व्हिडीओ सोमवारी सोशल मीडियावर व्हायरल झाला. या ९१ वर्षीय कलाकाराने आपल्या गायनाने आणि डान्सने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. आशा भोसले यांनी या वर्षी आलेल्या ‘बॅड न्यूज’ सिनेमातील करण औजलाचे ‘तौबा तौबा’ हे गाणे गायले. एवढेच नाही, तर विकी कौशलने प्रसिद्ध गाण्यावर केलेल्या सिग्नेचर डान्स स्टेपही त्यांनी केल्या. लाईव्ह प्रेक्षकांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचे कौतुक केले.
सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव
इंटरनेटवरही आशा भोसले यांच्या या परफॉर्मन्सची भरभरून स्तुती करण्यात आली. एका इन्स्टाग्राम युजरने लिहिले, “आशा भोसले यांनी दुबई शोमध्ये केवळ ‘तौबा तौबा’ गायलेच नाही, तर त्यावर डान्सही केला! ! लिजेंडरी! ” दुसऱ्याने लिहिले, “त्यांचा गोडसा डान्स. वाह”. एका चाहत्याने हा डान्स “आयकॉनिक आहे” असे म्हटले.
करण औजलाची प्रतिक्रिया
हे गाणे तयार करणाऱ्या करण औजलाने इन्स्टाग्राम स्टोरीत आशा भोसले यांच्यासाठी भावनिक पोस्ट लिहिली. त्याने म्हटले, “आशा भोसलेजी, संगीताच्या जिवंत देवीने ‘तौबा तौबा’ गाणं, गायलं… एका अशा मुलाने लिहिलेलं गाणं, जो एका छोट्या गावात वाढला, ज्याला संगीताचा कुठलाही वारसा नव्हता, संगीत साधनांविषयी काहीही ज्ञान नव्हतं. ही धून अशा व्यक्तीकडून तयार झाली, जो कोणतंही वाद्य वाजवत नाही. या गाण्याला फक्त चाहत्यांकडूनच नाही, तर संगीत क्षेत्रातील कलाकारांकडूनही खूप प्रेम आणि ओळख मिळाली. मात्र, हा क्षण खरोखरच आयकॉनिक आहे आणि मला आयुष्यभर लक्षात राहील. मी खूप धन्य झालो आहे. हा क्षण मला तुमच्यासाठी आणखी चांगल्या धुन तयार करण्यासाठी प्रेरणा देतो.”
करणने आशा भोसले यांच्या परफॉर्मन्सचा व्हिडीओ शेअर करत लिहिले, “मी हे २७ व्या वर्षी हे गाणं लिहिलं होतं, पण त्यांनी ते ९१ व्या वर्षी माझ्यापेक्षा चांगलं गायलं.” आशा भोसले यांनी दुबईतील सोनू निगमबरोबरच्या कॉन्सर्टमध्ये ‘तौबा तौबा’वर परफॉर्मन्स दिला.