बॉलीवूडमधील काही कलाकार हे प्रेक्षकांच्या वर्षानुवर्षे लक्षात राहतात. आपल्या सहज अभिनयाने, वेगळ्या धाटणीच्या भूमिका साकारत हे कलाकार प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत असतात. अशा कलाकारांपैकी एक राजेश खन्ना होते. चित्रपटांबरोबरच शूटिंगही सुरू असतात. ज्या गोष्टी घडतात, त्यांचीदेखील मोठी चर्चा होताना दिसते. आता अभिनेत्री आशा पारेख यांनी राजेश खन्ना यांच्याबाबत सांगितलेला किस्सा सध्या चर्चेत आहे.

काय म्हणाल्या आशा पारेख?

अभिनेत्री आशा पारेख यांनी एकदा ‘इंडियन आयडॉल’ या शोमध्ये हजेरी लावली होती. त्यावेळी त्यांनी राजेश खन्ना यांच्याविषयी आठवण सांगताना म्हटलेले, “१९६७ ला ‘बहारों के सपने’ या चित्रपटात मी पहिल्यांदाच राजेशबरोबर काम करीत होते. त्यावेळी त्याला माझी भीती वाटायची. राजेश खूप अंतर्मुख होता आणि तो त्याच्या करिअरच्या सुरुवातीच्या काळात जास्त कोणाशी बोलायचा नाही. त्याने नुकतीच त्याच्या करिअरला सुरुवात केली होती आणि तो बोलण्यास संकोच करीत असे. एक दिवस त्याने माझ्याकडे पाहून तोंड दुसरीकडे वळवले, त्यामुळे मला खूप वाईट वाटले. त्यासाठी मी त्याला ओरडले. त्यानंतर त्याने मला फोन केला आणि स्पष्टीकरण देत म्हटले, “माझ्या वागण्याचा तसा अर्थ नव्हता. मला तुमची भीती वाटते म्हणून हे झाले.” पण आम्ही दोन-तीन चित्रपट एकत्र केले. त्यानंतर तो मला त्याच्या मनातील गोष्टी सांगत असे. माझ्याशी बोलत असे”, अशी आठवण अभिनेत्री आशा पारेख यांनी सांगितली आहे.

आणखी एका मुलाखतीत, त्यांनी राजेश खन्नांबद्दल बोलताना म्हटले, “राजेशच्या आळशीपणाचा मला कधीच त्रास झाला नाही. काही चित्रपटांत एकत्र काम केल्यावर आमच्यात मैत्री झाली होती. त्यामुळे आम्ही मॅनेज करीत असू.”

हेही वाचा: ‘देवरा: पार्ट १’ चित्रपटाच्या कमाईत वाढ, पाच दिवसांत जमवला ‘इतक्या’ कोटींचा गल्ला

‘इंडिया टुडे’ला जेव्हा आशा पारेख यांनी मुलाखत दिली होती, त्यावेळी त्यांना विचारण्यात आले की राजेश खन्नांबरोबर काम करणे अवघड होते का? त्यावर बोलताना आशा पारेख यांनी म्हटलेले, “तो जेव्हा सुपरस्टार झाला, तेव्हा थोडे अवघड होते. मात्र त्याच्या सुरुवातीच्या चित्रपटांपैकी एक माझ्याबरोबरचा ‘बहारों के सपने’ हा चित्रपट होता. त्यावेळी तो अत्यंत शांत आणि अंतर्मुख असायचा. अनेकदा तो माझ्या घरीही येत असे. जेव्हा तो यशस्वी झाला तेव्हा त्याचे वागणे बदलले. जेव्हा त्याच्या यशस्वी कारकिर्दीला सुरुवात झाली, त्यावेळी तो पूर्णत: वेगळा माणूस झाला. तो नेहमी मुलींनी वेढलेला असायचा.”

आशा पारेख आणि राजेश खन्ना यांनी ‘बहारों के सपने’, ‘कटी पतंग’, ‘धर्म और कानून’, ‘आन मिलो सजना’ या चित्रपटांत एकत्र काम केले होते. हे चित्रपट लोकप्रिय ठरले होते.