प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांनी आपल्या अभिनयाने अनेक वर्ष बॉलीवूडवर राज्य केलं. त्यांना नुकतंच दादासाहेब फाळके पुरस्कर देऊन गौरविण्यात आलं. कोणत्याही चित्रपटासाठी प्रत्येक अभिनेत्याची पहिली पसंती आशा पारेख यांनाच असायची. अभिन्याबरोबरच त्यांनी त्यांच्या बहारदार नृत्याने प्रेक्षकांच्या मनात घर केलं.
नुकतंच गोव्यातील ५३ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात त्यांनी हजेरी लावली होती. याचदरम्यान त्यांनी सध्याच्या स्त्रियांच्या वेशभुषेबद्दल टिप्पणी केली आहे. याविषयी बोलताना आशा पारेख म्हणाल्या, “सध्या चित्र पूर्णपणे बदलत चाललं आहे. पाश्चात्य संस्कृतीचं उदात्तीकरण फारच वाढलं आहे हे माझ्या आकलनशक्तिपलीकडचं आहे. मुली चक्क गाऊन परिधान करून लग्नसमारंभाला येत आहेत. आपल्याकडची घागरा चोली, साड्या, सलवार कुरतासारखे प्रकार आहेत ना ते वापरा.”
या सगळ्याचा संबंध चित्रपटांशी जोडत त्या पुढे म्हणाल्या, “पारंपरिक वेशभूषा का परिधान करत नाही? कारण आजची मुलं मुली पडद्यावर दिसणाऱ्या कलाकारांचं अनुकरण करत आहेत. आपण जाड आहोत बारीक आहोत याचा विचार न करता कलाकार जे कपडे वापरतात त्यांचं अनुकरण सध्याच्या मुली करत आहेत. ते कपडे आपल्याला शोभतील का याचा जराही विचार त्या करत नाहीत. हे पाश्चिमात्य संस्कृतीचं उदात्तीकरण पाहून मला प्रचंड दुःख होतं.”
आणखी वाचा : हॉलिवूड स्टार जॉनी डेप त्याच्या अजरामर ‘जॅक स्पॅरो’च्या भूमिकेत पुन्हा दिसणार का? जाणून घ्या
आशा पारेख यांनी कित्येक अजरामर चित्रपटात काम केलं आहे. एवढंच नाही तर त्यांनी निर्मितीक्षेत्रातसुद्धा नशीब आजमावून पाहिलं आहे. १९९० च्या अखेरीस आशा पारेख यांनी निर्मात्या व दिग्दर्शक म्हणूनही कारकीर्द गाजवली. २०१७ मध्ये प्रसिद्ध चित्रपट समीक्षक खालिद मोहम्मद यांच्यासह सहलेखन केलेले त्यांचे ‘द हिट गर्ल’ हे आत्मचरित्र प्रसिद्ध झाले होते.