लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा'(Chhaava) चित्रपट चांगलाच गाजल्याचे पाहायला मिळत आहे. १४ फेब्रुवारी २०२५ ला प्रदर्शित झालेल्या चित्रपटाची आजही बॉक्स ऑफिसवर यशस्वी घोडदौड सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. छावा लवकरच बॉक्स ऑफिसवर ५०० कोटींचा आकडा पार करेल असे म्हटले जात आहे. या चित्रपटात अभिनेता विकी कौशल प्रमुख भूमिकेत दिसत आहे. छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका त्याने साकारली आहे. विकी कौशलने साकारलेली ही भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली असून सर्वत्र त्याच्या भूमिकेचे तसेच चित्रपटाचे कौतुक होताना दिसत आहे. या चित्रपटात मराठी कलाकारसुद्धा महत्त्वाच्या भूमिकेत दिसले आहे, ज्यामध्ये संतोष जुवेकर, सारंग साठ्ये, सुव्रत जोशी, नीलकांती पाटेकर, किरण करमरकर, शुभंकर एकबोटे, आस्ताद काळे, मनोज कोल्हटकर, शिवराज वाळवेकर, आशीष पाथोडे हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकांत दिसले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘छावा’ चित्रपटात अंताजी यांची भूमिका आशीष पाथोडेने साकारली आहे. या भूमिकेलादेखील प्रेक्षकांचे भरपूर प्रेम मिळाले. आता आशीषने त्याच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ जेव्हा छावाच्या सेटवरील आहे. अभिनेत्याच्या शूटिंगचा शेवटचा दिवस होता तेव्हाचा हा व्हिडीओ आहे. आशीषने शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये शूटिंगचे ठिकाण दिसत आहे, ज्यामध्ये आशीष इतर कलाकार व टीमसह विकी कौशलदेखील दिसत आहे.

चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर हेदेखील या व्हिडीओमध्ये दिसत आहेत. हा व्हिडीओ शेअर करताना आशीषने लिहिले, “छावा चित्रपटाच्या शूटिंगचा माझा शेवटचा दिवस होता. सेटवर सर्व जण माझ्या अंताजी या पात्रावर प्रेमाचा वर्षाव करत होते.” पुढे त्याने लक्ष्मण उतेकर यांना टॅग करीत खूप प्रेम असे म्हणत सर्व गोष्टींसाठी खूप धन्यवाद असे लिहिले. तर विकी कौशलला टॅग करीत राजे असे लिहिले; तर विनित कुमार सिंहला भाऊ असे म्हणत हे दोघे मजा करण्याच्या मूडमध्ये होते असे लिहिले आहे. विकी कौशलने त्याच्या चेहऱ्याला केक लावल्याचे या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे.

शिवाजी सावंत यांच्या ‘छावा’ या गाजलेल्या कांदबरीवर आधारित या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. हा चित्रपट पाहिल्यानंतर प्रेक्षक भारावून गेल्याचे पाहायला मिळाले. प्रेक्षकांपासून ते मोठ मोठ्या कलाकार दिग्दर्शकांपर्यंत सर्वांना या चित्रपटाची भुरळ पडली आहे. या चित्रपटात विकी कौशलसह अक्षय खन्ना, रश्मिका मंदाना प्रमुख भूमिकेत दिसत आहेत. रश्मिकाने महाराणी येसुबाई यांची भूमिका साकारली आहे, तर अक्षय खन्नाने औरंगजेबाची भूमिका साकारली आहे.

दरम्यान, छावा चित्रपटाने २० दिवसांत ४७२.७३ कोटींची कमाई केली आहे. आता हा चित्रपट आणखी किती कमाई करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.