बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेते आशिष विद्यार्थी यांनी काही दिवसांपूर्वी दुसरं लग्न केलं. ५७ व्या वर्षी दुसरं लग्न केल्यामुळे आशिष यांच्यावर टीकेची झोड उठली. गेल्यावर्षी पत्नी राजोशीपासून विभक्त झाल्यावर त्यांनी रुपाली बरुआशी लग्नगाठ बांधली. पण, या लग्नामुळे नेटकऱ्यांनी त्यांना चांगलंच ट्रोल केलं. म्हातारपणात दुसरं लग्न केलंय, असंही म्हटलं गेलं. याच ट्रोलिंगवर आशिष विद्यार्थी यांनी उत्तर दिलंय.
हेही वाचा – “मी मायलेकीला सोडलं नाही”; गौतमी पाटीलच्या वडिलांचा दावा; म्हणाले, “मी पुण्यात असताना…”
‘इंडिया टुडे’शी बोलताना आशिष म्हणाले, “मी माझ्याबद्दल म्हातारा आणि त्यासारखे अनेक अपमानास्पद शब्द वाचले. मनोरंजक गोष्ट म्हणजे ही म्हातारा ही कमेंट प्रत्येकजण आपल्यापेक्षा वयाने मोठे असणाऱ्यांसाठी वापरत आहे. पण, त्यासोबतच आपण स्वतःला एक भीती दाखवत आहोत. कारण, आपल्यापैकी प्रत्येक जण हा म्हातारा होणारच आहे. आपण स्वतःला म्हणतोय, ‘ऐका, तुम्ही म्हातारे झाल्यामुळे काही करू नका.’ तर याचा अर्थ तुम्हाला दुःखी मरायचं आहे का? जर एखाद्याला सहवास हवा असेल तर त्याने लग्न का करू नये?” असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
हेही वाचा – गौतमी पाटीलचं जन्म नाव वेगळंच; वडिलांचा मोठा दावा, म्हणाले…
पुढे ते म्हणाले, “आपण प्रत्येकासाठी या भिंती का तयार करत आहोत? कायद्याचे पालन करणारा माणूस, जो कायदेशीररित्या कामे करतो, जो त्याचा कर भरतो आणि कठोर मेहनत करतो. तो कायदेशीररित्या दुसरं लग्न करण्यासाठी दुसऱ्या अशा व्यक्तीची निवड करत आहे, जिला कुटुंब हवंय, प्रेमाने जगायचं आहे. अशा बाबींमध्ये एकमेकांना ट्रोल करण्यापेक्षा आधार दिला पाहिजे. ही अशी गोष्ट आहे ज्याची मला अपेक्षा नव्हती आणि मला धक्का बसला कारण माझे संपूर्ण आयुष्यात मूल्यांवर जगलो आहे.”
आशिष पुढे म्हणाले, “एखादा माणूस म्हातारा झाल्यावर त्याची काळजी कोण घेणार? जे लोक कमेंट करत आहेत त्यांच्यापैकी कोणीही येऊन माझ्याकडे लक्ष देणार आहे का? जेव्हा आपण वयाच्या आधारे कोणाची तरी निंदा करत असतो, तेव्हा तुम्ही स्वतःवर मर्यादा घालता. हे फक्त नातेसंबंधांबद्दल नाही, तर लोकांना खूप गोष्टी करायच्या असतात पण लोक काय म्हणतील? हा विचार करून ते स्वतःला आवडीच्या गोष्टी करण्यापासून रोखतात.”
“आपल्याला आयुष्यात जे करायचं आहे, ते करण्याची आपल्याकडे क्षमता आहे आणि प्रत्येक व्यक्तीला आनंदी राहण्यासाठी आवश्यक असलेल्या गोष्टी करण्याचा पूर्ण अधिकार आहे,” असं या ट्रोलिंगबद्दल बोलताना आशिष विद्यार्थी म्हणाले.