सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेते आशिष विद्यार्थी त्यांच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आले आहेत. आशिष विद्यार्थी यांनी गुरुवारी(२५ मे) दुसऱ्यांदा लग्नगाठ बांधली. वयाच्या साठीत असताना आशिष विद्यार्थी दुसऱ्यांदा बोहल्यावर चढले. कोलकाता येथे रुपाली बरूआशी विवाहबंधनात अडकत त्यांनी नवीन आयुष्याला सुरुवात केली.
दुसरं लग्न केल्यानंतर आशिष विद्यार्थी यांनी याबाबत एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये त्यांनी पहिली पत्नी राजोशी बरुआ (पिलू विद्यार्थी) यांच्याबरोबर घटस्फोट घेण्यामागचं कारण स्पष्ट केलं आहे. ते म्हणाले, “आपल्या सगळ्याचं आयुष्य वेगळं आहे. आपल्या गरजा, आपल्याला मिळणाऱ्या संधी यादेखील वेगळ्या आहेत. आपण प्रत्येक जण त्याच्या पद्धतीने जीवन जगत आहे. पण, आपल्या सगळ्यांनाच आनंदी जीवन जगायचं आहे. २२ वर्षांपूर्वी माझ्या आयुष्यात पिलू म्हणजेच राजोशी आली. आमच्यात चांगली मैत्री झाली. आम्हाला अर्थ हा मुलगा आहे. तो आता २२ वर्षांचा असून नोकरी करत आहे.”
“या २२ वर्षांच्या एकत्र सहवासात आम्हाला एक-दोन वर्षांपूर्वी आमच्या भविष्याबद्दलच्या कल्पनेत थोडा फरक जाणवला. यावर आम्ही विचार व प्रयत्नही केले. पण, तडजोड केली तर दोघांपैकी एक जण दुसऱ्यावर वरचढ होण्याची शक्यता आम्हाला जाणवली. त्यामुळे ज्या पद्धतीने आम्ही एकत्र ही २२ वर्ष आनंदाने एकमेकांसोबत घालवली, तशी ती पुढे जाणार नाहीत, हे आम्हाला जाणवलं. आम्ही दुसऱ्यांना दाखवण्यासाठी एकत्र तर राहू पण त्यात आनंद नसेल, याची जाणीव आम्हाला झाली. आम्हाला दोघांनाही हे नको होतं,” असंही पुढे ते म्हणाले.
हेही वाचा>> “थोडीतरी लाज…”, ६०व्या वर्षी आशिष विद्यार्थी यांनी दुसऱ्यांदा लग्नगाठ बांधल्यानंतर बॉलिवूड अभिनेत्याचं ट्वीट
आशिष विद्यार्थी पुढे म्हणाले, “दोघे एकत्र राहून त्यांच्या पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारे जीवन जगणारे लोक आम्ही पाहिले आहेत. पण आम्हाला असं आयुष्य नको होतं. त्यामुळेच आम्ही वेगळं होण्याचा निर्णय घेतला. आम्हाला या गोष्टीतही प्रतिष्ठा ठेवायची होती. एकत्र राहणारी माणसं जेव्हा वेगळी होतात, तेव्हा ती काहीशी नाराज असतात. त्यामुळे त्यांनी नाराजी व्यक्त केल्यावर इतर लोक त्यावर व्यक्त होतात. पण असं काही करायचं नाही, असं आम्ही दोघांनीही ठरवलं होतं. याबाबत आम्ही आमचा मुलगा अर्थबरोबरही बोललो. आमचे काही जवळचे नातेवाईक, मित्रमैत्रिणी यांच्याशीही आम्ही संवाद साधला. त्यानंतरच आम्ही घटस्फोटाचा निर्णय घेतला. आम्ही वेगळे झालो, पण मला एकटं राहायचं नव्हतं.”