बॉलीवूडचा नायक होणं सोपं पण, एखाद्या कलाकृतीकडे चौकटीबाहेरच्या चष्म्यातून पाहणारा दिग्दर्शक होणं कठीण! सर्वसामान्य कुटुंबातून बॉलीवूडमध्ये आलेल्या मराठी माणसाला सगळंच आवाक्याबाहेरचं वाटतं. या गैरसमजुतीला छेद देऊन मायानगरीत स्वत:ची ओळख निर्माण करणारे आणि अभिनेता, निर्माता, दिग्दर्शक अशा सगळ्या क्षेत्रात आपलं नाणं खणखणीत वाजवणारे मराठमोळे दिग्दर्शक म्हणून आशुतोष गोवारीकर यांना ओळखलं जातं. व्ही. शांताराम बापू यांच्यानंतर बॉलीवूडमध्ये ९० च्या दशकात मराठी माणसाचं वेगळंपण जपण्यात त्यांचा सर्वाधिक वाटा आहे. असंख्य चित्रपटांचा भडीमार न करता प्रेक्षकांना अतिशय मोजक्या आणि दर्जेदार कलाकृती देणाऱ्या दिग्दर्शकांमध्ये आशुतोष गोवारीकर यांचं नाव अग्रेसर आहे. आज त्यांच्या ६० व्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया त्यांचा प्रवास…

बॉलीवूड स्टार्सच्या भाऊगर्दीत आपलं वेगळेपण जपणाऱ्या आशुतोष गोवारीकर यांचा जन्म १५ फेब्रुवारी १९६४ रोजी मुंबईत झाला. त्यांच मूळ गाव कोल्हापूर असलं तरीही वांद्र्यात ते लहानचे मोठे झाले. त्यांच्या घरातले सगळे शिक्षणात अव्वल होते. त्यामुळे दिग्दर्शकाने देखील रसायनशास्त्रात उच्च शिक्षण घेण्याचा निर्णय घेतला. मुंबईच्या मिठीबाई महाविद्यालयात त्यांचं पदवी शिक्षण पूर्ण झालं. यानंतर त्यांनी रसायनशास्त्राशी संबंधित एक परीक्षा दिली परंतु, नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. त्या परीक्षेत आशुतोष उत्तीर्ण होऊ शकले नाहीत अन् त्यांचा कलाक्षेत्रातील प्रवास सुरू झाला.

Maharashtrachi Hasyajatra Fame Prasad Khandekar share special post for wife
“चाळीतून वन रुम किचनमध्ये…”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम प्रसाद खांडेकरने बायकोसाठी केली खास पोस्ट; म्हणाला, “तुझ्या साथीने…”
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
siddharth shukla shehnaz gill
शहनाज गिलने दिवंगत अभिनेता सिद्धार्थ शुक्लासाठी शेअर केली पोस्ट, ते दोन आकडे अन् चाहते म्हणाले…
Sane Guruji , book Sane Guruji Jeevan Gatha,
‘साने गुरुजींची जीवनगाथा’ आता ‘श्रवणीय’
S M krushna
महाराष्ट्राचे माजी राज्यपाल एस. एम. कृष्णा यांचे निधन, वयाच्या ९२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास!
Aishwarya Narkar Birthday
५० वर्षांच्या झाल्या ऐश्वर्या नारकर! ‘असा’ साजरा केला वाढदिवस; व्हिडीओत दाखवली संपूर्ण झलक, म्हणाल्या…
Veteran cartoonist Shi da Phadnis debuting at 100 shared his life journey expressing I wanted to be a Phadnis
‘मला शि. द. फडणीस व्हायचे होते’ शंभरीत पदार्पण केलेल्या शिदंची भावना
Milind Gawali
“तुम्ही कायम माझे हिरो”, वडिलांच्या ८५ व्या वाढदिवसानिमित्त मिलिंद गवळींची खास पोस्ट; म्हणाले, “पोलीस खात्यातून Retire…”

महाविद्यालयातील सांस्कृतिक कार्यक्रमात त्यांचा सक्रिय सहभाग होता. यातूनच पुढे आशुतोष यांची पावलं अभिनेता व्हायच्या दिशेने वळू लागली. अल्पावधीतच त्यांना दिग्दर्शक केतन मेहताच्या ‘होली’ चित्रपटात भूमिका मिळाली. ‘होली’मध्ये नसरुद्दीन शहा, परेश रावल, ओम पुरी, इत्यादी दिग्गज कलाकारांबरोबर काम आल्याने त्यांचा आत्मविश्वास दुणावला. याशिवाय ‘नाम’, ‘कच्ची धूप’, ‘गूँज’, ‘इंद्रधनुष’, ‘कमला की मौत’, ‘सलीम लंगडे पे मत रो’, ‘गवाही’, चमत्कार’, ‘जानम’ अशा बऱ्याच चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलं. एवढंच नाही तर ‘CID’, ‘सर्कस’, ‘भारत एक खोज’ या मालिकांमध्ये ते झळकले होते. अभिनयाची गाडी रुळावर येत असतानाच त्यांच्या आयुष्यात असे काही प्रसंग घडले की, आपण उत्तम दिग्दर्शक होऊ शकतो याची जाणीव त्यांना झाली.

हेही वाचा : ‘तुझे मेरी कसम’ म्हणत रितेश-जिनिलीया ‘असे’ झाले महाराष्ट्राचे लाडके दादा-वहिनी!

“मी सेटवर शूटिंग करताना एके दिवशी मध्यरात्रीच्या सीनचं शूटिंग सुरू होतं. परंतु, त्यावेळी सेटवरच्या घडाळ्यात संध्याकाळचे ५-६ वाजले होते. मी संबंधित दिग्दर्शकाला सांगूनही त्यांनी त्यात काहीच बदल केला नाही. तेव्हा माझ्या डोक्यात आलं अरे…आपण असं नक्कीच केलं नसतं. त्या घड्याळाने माझी दिशा बदलली. यासारखे अनेक प्रसंग घडले अन् शेवटी आमिर – शाहरुख या दोघांनी देखील माझं मनोबल उंचावलं. या सगळ्या गोष्टींमुळे मी दिग्दर्शक म्हणून पदार्पण करायचं ठरवलं.” असं आशुतोष गोवारीकर यांनी एबीपी माझाच्या मुलाखतीत सांगितलं होतं.

अखेर १९९३ मध्ये ‘पहला नशा’ या चित्रपटाच्या निमित्ताने त्यांनी दिग्दर्शक म्हणून पदार्पण केलं. यामध्ये दीपक तिजोरी, पूजा भट्ट आणि रविना टंडन यांच्या प्रमुख भूमिका होत्या. यानंतर १९९५ मध्ये आशुतोष यांनी परेश रावल यांना घेऊन ‘बाझी’ चित्रपट केला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर फारशी चमक दाखवली नाही. पण, त्याक्षणी खचून न जात त्यांनी एका नव्या प्रवासाला सुरुवात केली. या प्रवासाची वाट त्यांना थेट ऑस्करपर्यंत घेऊन जाणारी होती…

‘लगान’ची गोष्ट

आशुतोष यांनी ‘बाझी’नंतर हिंदी कलाविश्वातील निरनिराळे बदल अनुभवले. राजकारण, गुन्हेगारी, धर्म, हिंसा या नेहमीच्या विषयांपेक्षा एक वेगळी कलाकृती त्यांना मोठ्या पडद्यावर साकारायाची होती. पण, चित्रपटाचं लेखन करत असताना एक महत्त्वाची अट होती ती म्हणजे चित्रपटात एक नायक नसावा, तर अनेक नायकांचा एक सिनेमा असावा. याच भावनेने लेखन करण्यास त्यांनी सुरुवात झाली अन् अवघ्या १० दिवसांत कागदावर उतरला ऑस्करपर्यंत मजल मारणारा ‘लगान’!

lagan
लगान चित्रपट

आमिर खानला जेव्हा पहिल्यांदा या चित्रपटाची स्क्रिप्ट ऐकवली तेव्हा धोतर नेसलेला हिरो, क्रिकेट हे काहीच त्याला पटलं नव्हतं. परिणामी, मिस्टर परफेक्शनिस्टने हा चित्रपट नाकारला. पण, आशुतोष यांच्या मनात ‘लगान’साठीचा नायक आधीच ठरलेला होता. तब्बल ६ महिने स्क्रिप्टवर काम करून त्यांनी ही कथा पुन्हा एकदा आमिरला ऐकवली. अर्थात, अपेक्षित बदल झाल्याने आमिरने या चित्रपटासाठी होकार कळवला अन् दिग्गज कलाकारांची फौज घेऊन २००१ मध्ये रुपेरी पडद्यावर प्रदर्शित झाला ‘लगान’!

‘लगान’मुळे गोवारीकरांचं आयुष्य रातोरात बदललं. २००२ मध्ये सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनासाठी त्यांना बॉलीवूडमधील मानाचे सगळे पुरस्कार मिळाले. पण, या जोडीला भारतीय सिनेमाला एक वेगळी दिशा दाखवणारी गोष्ट घडली ती म्हणजे, ‘मदर इंडिया’, ‘सलाम बॉम्बे’ यांच्यानंतर ऑस्करवारी करण्याचा बहुमान मिळाल्याने ‘लगान’च्या यशाला चार चाँद लागले. आशुतोषच्या दिग्दर्शनाची दखल जागतिक पातळीवर घेतली गेली आणि २००४ मध्ये त्यांना ऑस्करचा आजीवन मतदार (व्होटिंग मेंबर) व्हायची संधी मिळाली.

हेही वाचा : श्रेयस तळपदे : एकेकाळी पैशांची अडचण ते आज कोट्यवधींचा मालक, पडद्यामागच्या ‘पुष्पा’चा ‘असा’ आहे प्रवास

aamir khan
आमिर खान व आशुतोष गोवारीकर

काळजाला भिडणारा ‘स्वदेस’

“ये जो देस हैं मेरा स्वदेस हैं मेरा…” २००४ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘स्वदेस’ चित्रपटाचं खरं मूल्य दोन दशकांनी प्रेक्षकांना समजलंय असं म्हणायला हरकत नाही. आजही अनेक चित्रपट समीक्षक भारतासाठी पहिला ऑस्कर ‘स्वदेस’ने आणला असता असं छाती ठोकून सांगतात. शिवराम कारंथ यांच्या ‘चिगुरिदा कनासू’ आणि रजनी बक्षी यांच्या ‘बापू कुटी’ या साहित्यकृतींचा प्रभाव ‘स्वदेस’च्या कथेवर होता. या चित्रपटाने शाहरुखमधील रोमँटिक अभिनेत्याला प्रेमकथेतून बाहेर काढत वास्तवाच्या जगात उभं केलं. अभिनय, संगीत, कथा, दिग्दर्शन अशा सगळ्याच पातळीवर ‘स्वदेस’ सर्वोत्कृष्ट ठरला.

चार वर्षांच्या ब्रेकनंतर ‘जोधा अकबर’मधून दाखवली कमाल

‘जोधा अकबर’ चित्रपटाची घोषणा झाल्यावर एका नव्या वादाला सुरुवात झाली होती. पण, आशुतोष गोवारीकर डगमगले नाहीत. सगळ्या कोर्टकचेऱ्या पूर्ण करत १५ फेब्रुवारी २००८ मध्ये मोठ्या पडद्यावर ‘जोधा अकबर’ प्रदर्शित झाला. या चित्रपटासाठी आशुतोष यांनी अभिनेते व लेखक हैदर अली यांच्या मदतीने कथा आणि पटकथा लेखन केलं होतं. “हिंदू-मुस्लीम ऐतिहासिक प्रेमकथा मोठ्या पडद्यावर घेऊन येणं, त्याचा इतिहासाचा संदर्भ असणं यामुळे वाद होणार हे स्वाभाविक होतं. पण, आधीच सर्व इतिहासकार आणि विशेषतः जोधाबाईंशी संबंधित राजघराण्यांकडून रीतसर परवानग्या घेऊनच चित्रपटाचं काम सुरू केलं होतं.” असं आशुतोष यांनी अनेक मुलाखतींमध्ये सांगितलं आहे. ऐश्वर्या-हृतिक रोशनची ऑनस्क्रीन केमिस्ट्री प्रेक्षकांना एवढी भावली की, चित्रपट पाहून बॉलीवूडचे दिग्गज अभिनेते दिलीप कुमार यांनी आशुतोष यांची अभिमानाने पाठ थोपटली होती.

‘जोधा अकबर’नंतर आलेल्या ‘खेले हम जी जान से’ चित्रपटाला प्रेक्षकांनी आपलंसं केलं नाही अन् पुढे, ६ वर्षे ब्रेक घेऊन आशुतोष गोवारीकर यांनी २०१६ मध्ये ‘मोहेंजोदडो’च्या रुपात पुनरागमन केलं. जवळपास पाच हजार वर्षांपूर्वीचा जुना कालखंड पडद्यावर उभा केल्याने आशुतोष यांचं कौतुक केलं गेलं पण, काही तांत्रिक उणिवा आणि पटकथेअभावी चित्रपट प्रेक्षकांचं मनोरंजन करू शकला नाही. परंतु, दुसरीकडे त्यावर्षी प्रदर्शित झालेल्या ‘व्हेंटिलेटर’ या मराठी सिनेमाने चित्रपटसृष्टी गाजवली होती. यामध्ये आशुतोष यांनी राजा कामेरकर ही भूमिका साकारली होती. अशातच पडद्यामागे गोवारीकरांची एका मोठ्या प्रोजेक्टसाठी तयारी सुरू होती तो होता ‘पानिपत’.

‘पानिपत’चा इतिहास व शौर्यगाथा तरुणपिढीला कळावी या उद्देशाने या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली. हिंदी-मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक नामवंत कलाकार चित्रपटात झळकले होते. परंतु, ऐतिहासिक चित्रपट आणि वादविवाद हे समीकरण जणू ठरलेलंच आहे. त्याप्रमाणे ‘पानिपत : द ग्रेट बेट्रेयल’ प्रदर्शित झाल्यावर आशुतोष गोवारीकर यांना जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्या. ऐतिहासिक घटनांची छेडछाड केल्याचा आरोप त्यांच्यावर अनेक संघटनांनी लावला. या वादावर आशुतोष गोवारीकर म्हणाले होते, “जेव्हा पण आम्ही ऐतिहासिक चित्रपटांची निर्मिती करतो, तेव्हा चित्रपटाच्या कथेत कोणता भाग दाखवण्यात येणार आहे यावरून वाद निर्माण होणं स्वाभाविक आहे. इतिहासाच्या पुस्तकात बरीच पानं असतात, पण प्रत्येक गोष्ट चित्रपटात दाखवणं शक्य नसतं. एका ठराविक वेळेत ठराविक गोष्ट दाखवावी लागते.” मराठा साम्राज्याच्या इतिहासातील महत्त्वाचे पर्व असलेल्या पानिपतच्या तिसऱ्या लढाईवर ‘पानिपत: द ग्रेट बेट्रेयल’ हा चित्रपट आधारित होता. अर्जुन कपूर आणि क्रिती सेनॉनसह संजय दत्तने यामध्ये प्रमुख भूमिका साकारली होती. अनेक समीकरणं चुकली अन् ‘पानिपत’कडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली. अखेर गेली काही वर्षे दिग्दर्शनात रमलेल्या आशुतोष गोवारीकर यांनी नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘काला पानी’ सीरिजमध्ये महत्त्वाची भूमिका साकारली आहे.

भारतीय सिनेमाला ‘लगान’, ‘जोधा अकबर’सारख्या दमदार कलाकृती देणाऱ्या आशुतोष गोवारींकरांनी करिअरमध्ये अनेक चढउतार पाहिले. परंतु, पडद्यावर काहीतरी वेगळं आणि भव्य कलाकृती साकारण्याची आवड त्यांनी कायमच जपली. अशा या चौकटीबाहेर विचार करून पडद्यावर भव्य कलाकृती साकारणाऱ्या अवलिया दिग्दर्शकाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

Story img Loader