Konark Gowariker Niyati Kanakia Wedding: बॉलीवूडमध्ये लगीनघाई सुरू आहे. नुकताच रणबीर कपूर, करीना कपूर यांच्या आत्याचा मुलगा व अभिनेता आदर जैन गर्लफ्रेंड अलेखा अडवाणीबरोबर लग्न बंधनात अडकला. आता एका मराठमोळ्या दिग्दर्शकाच्या मुलाच्या लग्नाची तयारी सुरू आहे. ‘जोधा अकबर’सह अनेक सुपरहिट बॉलीवूड चित्रपटांचे मराठमोळे दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांचा मोठा मुलगा लवकरच गर्लफ्रेंडशी लग्न करणार आहे.
आशुतोष व सुनीता गोवारीकर यांचा मुलगा कोणार्क गोवारीकर २ मार्च रोजी लग्नबंधनात अडकणार आहे. कोणार्क नामांकित रिअल इस्टेट डेव्हलबर रसेश बाबुभाई कनकिया यांची कन्या नियती कनकियाशी लग्न करणार आहे. कोणार्क व नियती यांच्या लग्नाचा सोहळ्या भव्यदिव्य असेल. या लग्नात सेलिब्रिटींसह उद्योगविश्वातील नामांकित उद्योगपती हजेरी लावतील. तसेच या कोणार्क व नियती दोघांचे कुटुंबीय, नातेवाईक व मित्र-मैत्रिणी या लग्नात उपस्थित राहणार आहेत.
कोणार्क गोवारीकरबद्दल बोलायचं झाल्यास तो त्याच्या वडिलांबरोबर काम करतोय आणि चित्रपट निर्मितीचे बारकावे शिकत आहे. तो त्याच्या वडिलांप्रमाणेच चित्रपट उद्योगात काम करण्यास उत्सुक आहे. आशुतोष व सुनीता गोवारीकर यांना दोन मुलं आहेत. कोणार्क हा थोरला मुलगा असून धाकट्या मुलाचे नाव विश्वांग गोवारीकर आहे.
आशुतोष गोवारीकर यांनी दिग्दर्शनाबरोबरच अभिनयातही पाऊल ठेवलं आहे. ते शेवटचे ‘मानवत मर्डर्स’मध्ये झळकले होते. त्याचबरोबर ‘काला पानी’ या वेब सीरिजमध्येही त्यांनी मोठी व महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती. त्यांनी दिग्दर्शित केलेल्या शेवटच्या सिनेमाबद्दल बोलायचं झाल्यास तो ‘पानीपत’ होता. या चित्रपटात अर्जुन कपूर, क्रिती सेनॉन, संजय दत्त हे कलाकार होते. २०१९ साली आलेला हा ऐतिहासिक चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला होता.
नियती व कोणार्क यांचे फोटो –
आशुतोष गोवारीकर यांनी आतापर्यंत ‘लगान’, ‘स्वदेस’, ‘जोधा अकबर’, ‘मोहेंजोदारो’, ‘बाजी’, ‘पानीपत’ असे अनेक चित्रपट दिग्दर्शित केले आहेत. यापैकी बहुतांशी चित्रपट सुपरहिट ठरले होते. आशुतोष गोवारीकर त्यांच्या भव्यदिव्य चित्रपटांसाठी ओळखले जातात.