अभिनेता आशुतोष राणा यांचा ५५ वा वाढदिवस आहे. आशुतोष राणा यांनी त्यांच्या दमदार अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडमध्ये स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं. १० नोव्हेंबर १९६७ मध्ये मध्यप्रदेशच्या नरसिंहपूर येथे जन्मलेल्या आशुतोष राणा यांनी ‘स्वाभिमान’ या मालिकेतून अभिनय क्षेत्रात पाऊल टाकलं होतं. पण त्यांना खरी ओळख ‘दुश्मन’ चित्रपटातील भूमिकेमुळे मिळाली होती. त्यांच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये त्यांनी बऱ्याच दमदार भूमिका साकारल्या होत्या. पण आपल्या अभिनयाची प्रेक्षकांवर दमदार छाप पाडणाऱ्या आशुतोष राणा यांना महेश भट्ट यांनी धक्के मारून सेटवरून बाहेर काढलं होतं.
आशुतोष राणा हे मनोरंजन क्षेत्रात त्यांच्या गुरुंच्या सांगण्यावरून आले होते. त्यांच्या गुरुंनी त्यांना महेश भट्ट यांना भेटण्याचा सल्ला दिला होता. तसेच आशुतोष राणा यांच्या पहिल्या प्रोजेक्टबाबतही सांगितलं होतं. गुरुंनी आशुतोष राणा यांचा पहिला प्रोजेक्ट ‘एस’ अक्षरावरून सुरू होणारा असेल असंही सांगितलं होतं. त्यानंतर काहीच विचार न करता आशुतोष राणा यांनी गुरुंचा आदेश मानून मुंबई गाठली होती. याच ठिकाणी त्यांना महेश भट्ट यांची ‘स्वाभिमान’ ही मालिका मिळाली होती. त्यानंतर त्यांनी बऱ्याच मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केलं.
आणखी वाचा- ‘या’ दोन व्यक्तींमुळे पालटलं अशुतोष राणाचं नशीब; घेतला कलाविश्वात येण्याचा निर्णय
आशुतोष राणा यांना महेश भट्ट यांनी कशाप्रकारे सेटवरून हाकलून लावलं होतं याचा किस्सा त्यांनी एका मुलाखतीत सांगितला होता. ते म्हणाले, “एकदा मी निर्माता-दिग्दर्शक महेश भट्ट यांना भेटायला गेलो होतो. त्यावेळी मी त्यांच्या समोर जाताच त्यांच्या पायांना हात लावून नमस्कार केला, पण मी असं करताच महेश भट्ट भडकले. कारण त्यांना त्यांच्या पाया पडणारी माणसं आवडत नसत. त्यामुळे त्यांनी मला धक्के मारून सेटवरून हाकलून दिलं होतं. एवढंच नाही तर सेटवरील इतर लोकांवरही ते, मला सेटवर का येऊ दिलं असं म्हणून भडकले होते.”
आणखी वाचा- रेणुका शहाणेंच्या सोशल मीडियावर व्यक्त होण्यावर पती आशुतोष राणा म्हणतात..
अर्थात हे सर्व होऊनही आशुतोष राणा यांनी हार मानली नाहीच. ते जेव्हाही महेश भट्ट यांना भेटायचे किंवा त्यांना पाहायचे तेव्हा तेव्हा वाकून त्यांच्या पायांना हात लावून नमस्कार करायचे. त्यानंतर एकदा महेश भट्ट यांनी आशुतोष राणा यांना असं करण्याचं कारण विचारलं. त्यावर उत्तर देताना आशुतोष राणा म्हणाले, “आपल्यापेक्षा वयाने मोठ्या असलेल्या व्यक्तीचे चरणस्पर्श करून आशीर्वाद घेणं आमचे संस्कार आहेत. जे मला सोडता येत नाहीत.” आशुतोष यांचं बोलणं ऐकून महेश भट्ट इंप्रेस झाले आणि त्यांनी ‘स्वाभिमान’ या मालिकेसाठी त्यांना कास्ट केलं. आशुतोष राणा यांनी महेश भट्ट यांच्याबरोबर ‘जख्म’ आणि ‘दुश्मन’ या चित्रपटांमध्ये काम केलं आहे.