Ashutosh Rana Birthday Special: आशुतोष राणा पडद्यावर जेव्हा खलनायक साकारतो तेव्हा त्याच्या त्या पात्राची आपल्याला भीती वाटते, राग येतो. त्याच्या सशक्त अभिनयाची हीच पोचपावती म्हटली पाहिजे. ‘संघर्ष’ सिनेमातला त्याने साकारलेला लज्जाशंकर पांडे आणि मै इन्सान नहीं म्हणत मारलेली ती किंकाळी… ही अजूनही कानात घुमते. भूमिकेशी एकरुप होणं म्हणजे काय हे आशुतोष राणाने दाखवून दिलंय. हिंदी सिनेसृष्टीला जुन्या काळापासून सशक्त खलनायकांची परंपरा आहे. ती परंपरा दोन पावलं पुढे नेण्याचं काम आशुतोष राणा समर्थपणे करतो आहे. आशुतोष राणाची रील लाईफ आणि रिअल लाईफ दोन्हीही रंजकच आहे. कारण रेणुका शहाणे आणि त्याचं लग्न तिला अनोख्या स्टाईलने केललं प्रपोजही चर्चेत राहिलं. आशुतोषच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपण जाणून घेऊ त्याच्याविषयी माहीत नसणारे किस्से.
१० नोव्हेंबर १९६७ या दिवशी मध्य प्रदेशातल्या नरसिंहपूर जिल्ह्यातील एका गावात आशुतोषचा जन्म झाला. आशुतोषला लहानपणापासूनच नाटकांमध्ये काम करायची हौस होती. गावात होणाऱ्या रामलीलांमध्ये आशुतोष रावण साकारत असे. आपण जे साकारत आहोत त्यातच आपण पुढे जाणार आहोत.. याची काही कल्पना आशुतोषला त्या वयात नव्हती.
आशुतोषला वकील व्हायचं होतं
आशुतोषने एलएलबी केलं आहे. खरंतर त्याला वकील व्हायचं होतं. त्याच्या गुरुंनीही त्याला तू चांगला वकील हो आणि त्यातच तुझं करीअर कर असा सल्ला दिला होता. मात्र आशुतोषची पावलं राष्ट्रीय नाट्य विद्यालय अर्थात नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाकडे वळली. एनएसडीमध्ये अभिनयाचे धडे गिरवल्यानंतर आशुतोष राणाला त्याच संस्थेत नोकरी मिळाली. मग आशुतोषने सिनेमासृष्टीत येण्याचा निर्णय घेतला. मात्र त्याचा हा प्रवास सोपा नव्हता.
महेश भट्ट यांनी आशुतोषला सेटवरुन बाहेर काढलं होतं
महेश भट्ट यांना भेटण्यासाठी आशुतोषला एक संधी मिळाली. त्यावेळी आशुतोष त्यांना भेटला आणि त्यांच्या पाया पडला. महेश भट्ट यांना ही बाब इतकी खटकली की त्यांनी आशुतोषला सेटवरुन बाहेर काढलं होतं. एवढंच नाही आपल्या सहाय्यक दिग्दर्शकांवरही महेश भट्ट ओरडले होते आणि म्हणाले की याला तुम्ही आतच कसं येऊ दिलं? महेश भट्ट यांना पाया पडलेलं आवडत नाही हे आशुतोषला माहीत नव्हतं. असं असलं तरीही पुढे जेव्हा महेश भट्ट यांना आशुतोष भेटला तेव्हा त्याने वाकून नमस्कार केला. एकदा महेश भट्ट यांनी त्याला विचारलं की तू मला नमस्कार का करतोस? त्यावर आशुतोष म्हणाला की वडीलधाऱ्या माणसांना नमस्कार करणं हे माझ्यावर झालेले संस्कार आहेत आणि मी ते सोडू शकत नाही. आशुतोषचं उत्तर ऐकून महेश भट्ट गहीवरले आणि त्यांनी आशुतोषची गळाभेट घेतली.
अभिनेता होण्याचं श्रेय आईला
माझं अभिनेता किंवा कलाकार होण्याचं श्रेय मी माझ्या आईला देतो. कारण माझ्या आईने मला सांगितलं होतं की मोठा झाल्यानंतर तू आनंद वाटू शकशील असा व्यवसाय कर. मला वाटतं आईचे हे शब्दच मला घडवून गेले. आज माझा जो व्यवसाय आहे कलाकार म्हणून मी जे काम करतो आहे त्याचं श्रेय माझ्या आईला आहे. कारण एक कलाकार परिस्थिती बदलू शकत नसला तरीही मनस्थिती बदलू शकतो, तुम्हाला आनंद देऊ शकतो. असं आशुतोष राणाने एका मुलाखतीत सांगितलं होतं.
रेणुका शहाणे आणि आशुतोष राणा यांची लव्ह स्टोरी कशी आहे?
दुश्मन चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्यानंतर मी एक टीव्ही शो करणार होता. राजेश्वरी सचदेव आणि तेजस्विनी कोल्हापुरे यांना मी ओळखत होतो. हंसल मेहताचा ‘जयते’ पाहण्यासाठी आम्हाला बोलवलं होतं. माझ्याबरोबर या दोघी आल्या होत्या. राजेश्वरी सचदेव आणि रेणुका खूप चांगल्या मैत्रिणी आहेत. मलाही रेणुका शहाणे आवडत होती. ‘सैलाब’ मालिका मी आवर्जून बघायचो. आम्ही जेव्हा या चित्रपटाच्या निमित्ताने भेटलो तेव्हा साधारण आम्ही अर्धा तास एकमेकांशी बोललो. त्यावेळी आमची ओळख झाली. मला माझ्या बहिणीकडून तिचा मोबाइल नंबर मिळाला. रेणुकाला रात्री १० नंतर फोन करायचा नाही असं मला काही जणांनी सांगितलं होतं. पण मी तिला रात्री १०.३० ला फोन केला आणि रेणुकाने तो उचलला. आमच्यात चांगली बातचीत झाली. त्यानंतर तीन महिने आम्ही एकमेकांशी फोनवरुन बोलायचो. त्यानंतर मी तिला प्रपोज करायचं ठरवलं. त्यासाठी मी एक कविता लिहिली. ती कविता प्रश्नवाचक होती.
काय होती ती कविता?
प्रिय लिख कर निचें लिख दूं नाम तुम्हारा..
और कुछ जगह बीच में छोड नीचे लिख दूं सदा तुम्हारा..
लिखा बीच में क्या ये तुमको पढना है..
कागद पर मन कीं भाषा का अर्थ समझना है..
और जो भी अर्थ निकालोगी तुम वह मुझको स्वीकार
झुके नैन, मौन अधर या कोरा कागज अर्थ सभी का प्यार
ही कविता मी तिला पाठवली त्यानंतर रेणुकाने एक पॉज घेतला आणि मला म्हणाली मला वाटतं की मी तुमच्या प्रेमात पडले आहे. त्यावेळी मला खूप आनंद झाला. रेणुका तेव्हा गोव्याला होती मी तिला सांगितलं की तू परत ये आपण बोलू. ती आली त्यानंतर अजूनही परत गेलीच नाही. असं आशुतोष राणा यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं.
आशुतोष राणा हा उत्तम कवीही आहे. त्याने केलेल्या अनेक कविता प्रसिद्ध आहेत. व्यंगात्मक लिहिणं ही आशुतोषची खासियत आहे. त्याने देशाच्या परिस्थितीवर केलेली एक कविताही खूप सुंदर होती.
देश चलता नहीं मचलता है
मुद्दा हल नहीं होता सिर्फ उछलता है
जंग मैदानपर नहीं मीडियापर जारी है
आज तेरी तो कल मेरी बारी है.. ही त्याची कविता खूप गाजली होती. त्याचं ‘रामराज्य’ हे पुस्तक चर्चेत राहिलं. पडद्यावर खलनायक रंगवणारा हा कलावंत त्याच्या खऱ्या आयुष्यात मृदू स्वभावाचा संवेदनशील माणूस आहे. हे त्याच्या शब्दांमधून कळतं.
आशुतोष राणाने आत्तापर्यंत विविध चित्रपटांमध्ये काम केलं आहे. मात्र ‘संघर्ष’, ‘दुश्मन’, ‘राज’, ‘कलयुग’, ‘मुल्क’, ‘धाकड’ हे चित्रपट आणि त्यातली त्याची दमदार भूमिका कायमच लक्षात राहिल. एखाद्या नायकाने पडदा व्यापून टाकला असं आपण कायमच ऐकतो. मात्र एखाद्या खलनायकाने पडदा व्यापून टाकला असं क्वचित ऐकायला मिळतं. आशुतोष राणा हा त्या प्रकारात मोडणारा कलावंत आहे. त्याने आत्तापर्यंत केलेलं काम हे त्याच्या अभिनयाला साजेसंच आहे. व्हिलनचा राग येतो, घृणा येते, चीड येते.. या सगळ्या गोष्टी म्हणजे त्याच्या कामाची पोचपावती असते. आशुतोष राणा अशाच पोचपावत्या मिळवत पुढे जातो आहे यात शंका नाही.