बॉलिवूडची देसी गर्ल अर्थात प्रियांका चोप्रा ही आता हॉलिवूडमध्ये काम करत असली तरी एक काळ तिने इथे गाजवला आहे. प्रियांका चोप्राच्या अभिनयाची दखल तिच्या ‘फॅशन’ या चित्रपटापासून लोकांनी घ्यायला सुरुवात केली. हा चित्रपट चांगलाच गाजला. मधुर भंडारकर दिग्दर्शित या चित्रपटात प्रियांकाबरोबरच कंगना व इतरही काही बॉलिवूडच्या कलाकारांनी महत्त्वाची भूमिका केली.
या चित्रपटात एका स्टायलिश फॅशन डिझायनरची भूमिका करणारा अभिनेता अश्विन मुशरन याने नुकतंच या इंडस्ट्रीबद्दल भाष्य केलं आहे. ‘फॅशन’ या चित्रपटानंतर अश्विनकडे त्याच प्रकारच्या भूमिका जास्त येऊ लागल्या याबद्दल अश्विनने भाष्य केलं असून ही इंडस्ट्री कलाकारांना काशाप्रकरे एका साच्यात बसवू पाहते यावरही अश्विनने त्याचं मत मांडलं आहे.
आणखी वाचा : महाभारतावरील चित्रपटात शाहिद कपूरची वर्णी; साकारणार महाकाव्यातील ‘हे’ महत्त्वाचं पात्र
‘फॅशन’मध्ये अश्विनने एका गे फॅशन डिझायनरच भूमिका निभावली होती. ‘इंडिया टूडे एनई’शी याविषयी बोलताना तो म्हणाला, “ही इंडस्ट्री कलाकारांना एका साच्यात अडकवते. तुमच्या दिसण्यावर तुम्ही कोणती भूमिका करणार हे ठरतं. फॅशनमध्ये मी एका गे व्यक्तीची भूमिका केली जी त्यावेळी फारसं कुणी करायला तयार नव्हतं. त्यानंतर मला तशाच भूमिका ऑफर झाल्या आणि मी त्यांना नकार दिला. माझ्यासाठी ते पात्र किती प्रभाव पाडणारं आहे ही गोष्ट महत्त्वाची असते.”
याबरोबरच या इंडस्ट्रीमध्ये मित्र कमावणे फार अवघड असल्याचंही अश्विनने स्पष्ट केलं. अश्विन हा बॉलिवूडमधील एक प्रसिद्ध अभिनेता आहे. त्याने संजय दत्तच्या ‘लगे रहो मुन्नाभाई’ व अनुराग बसूच्या ‘लाईफ इन अ मेट्रो’सारख्या चित्रपटातही महत्त्वाच्या भूमिका केल्या आहेत.