बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टी आणि केएल राहुल हे दोघेही गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत आहेत. सोमवारी २३ जानेवारीला अथिया-केएल राहुल या दोघांनी कुटुंबियांच्या उपस्थितीत सप्तपदी घेतली. सुनील शेट्टी यांच्या खंडाळा येथील फार्म हाऊसवर या दोघांचा लग्नसोहळा पार पडला. त्यानंतर आता त्यांच्या लग्नाचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे. नुकतंच केएल राहुलने त्यांच्या लग्नानंतरच्या एका पार्टीचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत अथियाच्या लूकने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे.
अथिया शेट्टी आणि क्रिकेटर केएल राहुल यांच्या लग्नाची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे. ते दोघेही काही दिवसांपूर्वी विवाहबंधनात अडकले. या खासगी विवाह समारंभाला दोघांच्याही कुटुंबातील सदस्य सहभागी झाले होते. लग्नानंतर राहुल आणि अथियाने सोशल मीडियावर प्री-वेडिंग फंक्शन्सचे अनेक फोटो शेअर केले आहेत. त्यानंतर आता केएल राहुलने लग्नानंतरच्या एका पार्टीचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत अथिया-केएल राहुल एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाल्याचे पाहायला मिळत आहे.
आणखी वाचा : अथिया शेट्टीने शेअर केले हळदीचे फोटो, मराठीत दिलेल्या कॅप्शनने वेधलं लक्ष
या पार्टीत अथियाने लाल रंगाचा ड्रेस परिधान केला होता. तर राहुलने यावेळी काळ्या रंगाचा कुर्ता परिधान केला होता. अथियाने याबरोबरच एक सुंदर चोकर आणि कानात हिऱ्याचे कानातले घातले होते. पण या व्हिडीओत अथियाच्या या लूकपेक्षा तिच्या गळ्यातील मंगळसूत्राने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले.
अथियाने या ड्रेसबरोबर तिचे मंगळसूत्र परिधान केले होते. तिच्या मंगळसूत्राची डिझाईन फारच खास आहे. यात काळे मणी आणि एक डायमंडचे पेन्डेंट पाहायला मिळत आहे. या पार्टीत ती तिचे मंगळसूत्र फ्लॉंट करताना दिसत आहे.
आणखी वाचा : आई झाल्यानंतर करिअर संपलं म्हणणाऱ्यांवर सपना चौधरीचा संताप; म्हणाली “तुमचा जन्म…”
दरम्यान, अथिया आणि केएल राहुल यांनी लग्नाची रिसेप्शन पार्टी अद्याप दिलेली नाही. अथियाचे वडील सुनील शेट्टी यांनी आयपीएलनंतर रिसेप्शन होणार असल्याची माहिती दिली होती. या रिसेप्शन पार्टीत बॉलिवूड व्यतिरिक्त भारतीय क्रिकेट संघाचे अनेक खेळाडू सहभागी होताना दिसणार असल्याचं बोललं जात आहे.