Attack on Saif Ali Khan : बॉलीवूड अभिनेता सैफ अली खान याच्यावर चाकू हल्ला झाला आहे. वांद्रे (पश्चिम) येथील त्याच्या घरात घुसून एका चोराने त्याच्यावर चाकू हल्ला केला. या हल्ल्यात तो जखमी झाला आहे. गुरुवारी मध्यरात्री अडीच वाजताच्या सुमारास तो त्याच्या कुटुंबियांसह घरात झोपला असताना ही घटना घडली. यानंतर खासदार सुप्रिया सुळेंनी सैफच्या कुटुंबाशी संवाद साधला आणि त्यानंतर माध्यमांना याबाबतची माहिती दिली. सैफवर सध्या लिलावती रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
सुप्रिया सुळे म्हणाल्या की सैफ अली खान यांच्या कुटुंबाशी मी संवाद साधला. मात्र त्यांची प्रायव्हसी ही महत्त्वाची आहे. काही वेळातच त्यांच्याकडून आणि पोलिसांकडून याबाबत अधिकृत माहिती देण्यात येईल. सैफ अली खान सेफ आहेत आणि रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. मात्र त्यांच्या कुटुंबाकडून याबाबत अधिकृतरित्या याची माहिती येईल तोपर्यंत आपण वाट बघू. हल्ला कसा झाला? काय घडलं मला माहीत नाही. ही घटना चिंता वाटणारीच आहे. याबाबत अधिकृत माहिती समोर येऊ द्या त्यानंतर काय प्रतिक्रिया द्यायची? गृहमंत्र्यांशी बोलायचं का? हे मी ठरवेन असं सुप्रिया सुळेंनी म्हटलं आहे.
हे पण वाचा- मोठी बातमी! सैफ अली खानवर चाकू हल्ला, अभिनेता गंभीर जखमी
नेमकं काय घडलं? काय माहिती समोर आली?
सैफ अली खान व करीना कपूर खान यांच्या वांद्रेतील घरात चोर शिरला होता. त्याने सैफवर चाकूने हल्ला केला. घरातील इतर सदस्य जागे झाल्यानंतर दरोडेखोर घटनास्थळावरून पळून गेल्याचं पोलिसांनी सांगितलं. सध्या पोलीस त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत. वांद्रे पोलीस याप्रकरणी तक्रार दाखल करणार आहेत.
मुंबई पोलिसांची प्रतिक्रिया
रात्री उशिरा अभिनेता सैफ अली खानच्या घरात एक अज्ञात माणूस घुसला, त्याने त्याच्या मोलकरणीबरोबर वाद घातला. जेव्हा सैफने हस्तक्षेप करून त्याला शांत करण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याने सैफ अली खानवर हल्ला केला. या घटनेत तो जखमी झाला आहे, पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत, अशी माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे.
वांद्रे भागात सैफ अली खानचं घर
वांद्रे भागात सैफ अली खानचं घर आहे. सैफ या घरात त्याची पत्नी करीना कपूर आणि त्याच्या दोन मुलांसह राहतो. सैफ अली खानला रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर सैफच्या घराबाहेरचा पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. घटनास्थळी जे सीसीटीव्ही फुटेज आहे ते देखील तपासलंं जातं आहे.