सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या आरोपीला रविवारी अटक करण्यात आली. सैफच्या घरात चोरीच्या उद्देशाने घुसलेल्या शरीफुल इस्लाम शेहजाद मोहम्मद रोहिल्ला अमीन फकीर उर्फ विजय दास नावाच्या या आरोपीने केलेल्या हल्ल्यात सैफ गंभीर जखमी झाला होता. आरोपीने सैफच्या पाठीवर चाकूने वार केले होते. चाकूचे एक टोक सैफच्या पाठीत घुसले होते. आरोपीने सैफवर हल्ला कसा केला, त्याबद्दल माहिती समोर आली आहे.
एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, हल्ल्यानंतर घुसखोर सैफच्या फ्लॅटमधून पळून गेला आणि सुमारे दोन तास इमारतीच्या बागेत लपून बसला होता. सैफला रक्तबंबाळ अवस्थेत लिलावती रुग्णालयात नेण्यात आलं होतं, तिथे डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करून त्याच्या पाठीतून चाकूचा तुकडा काढला होता.
नेमकं काय घडलं होतं?
“आरोपी चोरीच्या उद्देशाने सतगुरु शरण इमारतीतील सैफ अली खानच्या फ्लॅटमध्ये बाथरूमच्या खिडकीतून घुसला होता. त्याने घरात प्रवेश केल्यानंतर घरातील मदतीनसने पाहिलं. त्यानंतर त्याने तिच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. काही वेळातच सैफ अली खान तिथे आला आणि तो इजा करू शकतो हे लक्षात आल्यावर त्याने आरोपीला समोरून घट्ट पकडलं,” असे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.
“सैफने पकडल्याने आरोपी हालचाल करू शकत नव्हता, त्यामुळे त्याने स्वत:ला सोडवण्यासाठी सैफच्या पाठीत वार करायला सुरुवात केली. हल्ल्यात सैफ जखमी झाल्याने आरोपी त्याच्या पकडीतून सुटण्यात यशस्वी झाला,” अशी माहिती पोलिसांनी दिली. मग हल्लेखोराला खोलीत कोंडलं आणि सैफने त्याच्या मुख्य दरवाजाला कुलूप लावलं. पण हल्लेखोर बाथरूमच्या खिडकीतून आत आला होता, त्याच खिडकीतून तो पळून गेला.
सैफच्या फ्लॅटमधून आरोपी खाली आला आणि सुमारे दोन तास इमारतीच्या बागेत लपून बसला, असेही पोलिसांनी सांगितले. आरोपीच्या बोटांचे ठसे अनेक ठिकाणी आढळले. बाथरूमची खिडकी, डक्ट शाफ्ट आणि डक्टमधून त्याने आत जाण्यासाठी वापरलेल्या पायऱ्यांवरही बोटांचे ठसे आढळले.
आरोपी शरीफुल इस्लाम शेहजाद मोहम्मद रोहिल्ला अमीन फकीर उर्फ विजय दास (३०) मागील सात महिन्यांपासून भारतात राहत होता. तो कागदपत्रांची गरज भासणार नाही, अशा नोकऱ्या करत होता. त्याला रविवारी अटक केल्यानंतर मुंबईतील न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. दुसरीकडे, हल्ल्यानंतर पाच दिवसांनी सैफला मंगळवारी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.