मराठी चित्रपटसृष्टीसह बॉलीवूडमध्येसुद्धा अतुल कुलकर्णी यांनी वेगळी ओळख निर्माण केली आहे. ‘रंग दे बसंती’, ‘चांदनी बार’, ‘हे राम’ यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले. यानंतर त्यांनी ‘फॉरेस्ट गंप’ या इंग्रजी चित्रपटाचा हिंदी रिमेक म्हणजेच ‘लाल सिंग चड्ढा’ या चित्रपटाची कथा लिहिली, परंतु या चित्रपटाला ‘बॉयकॉट बॉलीवूड’ ट्रेंडचा फटका बसल्याचा दावा निर्मात्यांकडून करण्यात आला. ‘लाल सिंग चड्ढा’मध्ये परफेक्शनिस्ट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आमिर खानची मुख्य भूमिका असूनही बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट आपली कमाल दाखवू शकला नाही. यावर आता अभिनेते-लेखक अतुल कुलकर्णी यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
हेही वाचा : “मला मुलगी झाली तर…” बाळाच्या प्लॅनिंगबाबत राजकुमारचा खुलासा; अभिनेत्याचे उत्तर ऐकून शहनाझ झाली खूश
‘लाल सिंग चड्ढा’ला बॉक्स ऑफिसवर आलेल्या अपयशाबाबत अतुल कुलकर्णी यांना विचारले असता, त्यांनी आपली रोखठोक प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, मी गेली अनेक वर्षे इंडस्ट्रीत आहे आणि अशा गोष्टींचा अनुभवही घेतला आहे. जेव्हा तुम्ही एखाद्या नव्या प्रोजेक्टवर काम करता, तेव्हा तुम्हाला वाटते लोकांना हे आवडेल; परंतु दरवेळी तसे घडतेच असे नाही. बॉयकॉट ट्रेंडबद्दल विचारले असता अतुल कुलकर्णी म्हणाले, “प्रेक्षकांना पूर्ण अधिकार आहे काय पाहावे, काय पाहू नये… मग तो चित्रपट असो किंवा एखादे चित्र… प्रेक्षकांनी काय बघावे हे इतर कोणीही ठरवू नये.”
हेही वाचा : “हा शेवटचा चित्रपट…” ‘द केरला स्टोरी’ फेम अदा शर्माचे वक्तव्य, म्हणाली “पुन्हा संधी मिळेल की नाही…”
दरम्यान, लवकरच अतुल कुलकर्णींच्या लोकप्रिय वेब सीरिजचा पुढील भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. लोकप्रिय ‘सिटी ऑफ ड्रीम्स’ या वेब सीरिजचा तिसरा भाग २६ मे रोजी प्रदर्शित होणार आहे. याविषयी सांगताना ते म्हणाले, “तुम्ही तुमच्या वैयक्तिक जीवनात जे काही करता त्याचे मूळ हे राजकारण असते. त्यामुळे कोणीही राजकारणाकडे दुर्लक्ष करू शकत नाही.” ही वेब सीरिज राजकारणावर आधारित आहे.
‘सिटी ऑफ ड्रीम्स’च्या तिसऱ्या सीझनमध्ये अतुल कुलकर्णींबरोबर प्रिया बापट, सचिन पिळगावकर, एजाज खान, रणविजय सिंग यांच्या प्रमुख भूमिका आहेत.