ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरुष’ चित्रपट अखेरीस आज प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाने प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली होती. इतकंच नव्हे तर चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच प्रेक्षकांनी तिकिटांचं अगाऊ बुकिंग केलं. सध्या या चित्रपटाची जोरदार चर्चा रंगताना दिसत आहे. पण या चित्रपटाबाबत संमिश्र प्रतिक्रिया समोर येत आहे. काहींनी या चित्रपटाचं भरभरुन कौतुक केलं आहे. तर या चित्रपटाने अपेक्षाभंग केला असं काहींचं म्हणणं आहे. आता ‘आदिपुरुष’मध्ये हनुमानाच्या तोंडी असलेले संवाद ऐकून प्रेक्षक संतापले आहेत.
या चित्रपटात वापरण्यात आलेले व्हीएफएक्सही प्रेक्षकांच्या पसंतीस पडले नाहीत. शिवाय चित्रपटातील काही संवादही चर्चेचा विषय ठरत आहेत. चित्रपटात हनुमानाच्या तोंडी असलेले संवाद ऐकून तर प्रेक्षकांना राग अनावर झाला आहे. सोशल मीडियाद्वारे या संवादावरुन ‘आदिपुरुष’ला ट्रोल करण्यात येत आहे.
एका युजरने ट्वीट करत हनुमानाच्या तोंडी असलेला संपूर्ण संवाद सांगितला. “कपडा तेरे बाप का, तेल तेरे बाप का, आग भी तेरे बाप की, तो जलेगी भी तेरे बाप की” असा संवाद हनुमानाच्या तोंडी आहे. हा संवाद ऐकून प्रेक्षकांनी संताप व्यक्त करण्यास सुरुवात केली. हनुमानाचा असा संवाद कसा काय असू शकतो? असं प्रेक्षक म्हणत आहेत.
सोशल मीडियावर ‘आदिपुरुष’बाबत नकारात्मक चर्चांना उधाण आलं आहे. या चित्रपटाने खरं तर प्रेक्षकांचा अपेक्षाभंग केला आहे. हा चित्रपट तेलुगू, हिंदी, तमिळ, मल्याळम, कन्नडमध्ये प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात प्रभास भगवान राम, क्रिती सेनॉन सीता आणि सैफ अली खान रावणाच्या भूमिकेत आहेत. तसेच देवदत्त नागेने हनुमानाची भूमिका साकारली आहे.