सलमान खानचा ‘सिकंदर’ चित्रपट रिलीज झाल्यावर त्याचा फटका ‘छावा’ला बसेल आणि कमाईत घट होईल, असं म्हटलं जात होतं. मात्र याच्या अगदी उलट घडलं आणि अनपेक्षित घडलं आहे. लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ला ५१ व्या दिवशी एका आठवड्यापूर्वी रिलीज झालेल्या ‘सिकंदर’पेक्षा जास्त प्रेक्षक मिळाले.

‘सिकंदर’ ईदला ३० मार्च रोजी प्रदर्शित झाला. तर ‘छावा’ १४ फेब्रुवारीला व्हॅलेंटाइन डेला प्रदर्शित झाला होता. ५१ व्या दिवशीही ‘छावा’ सिनेमा पाहण्यासाठी प्रेक्षक जात आहेत, तर दुसरीकडे भाईजानच्या ‘सिकंदर’कडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली आहे. दमदार ओपनिंग करणारा ‘सिकंदर’ प्रेक्षकांना आकर्षित करण्यात पूर्णपणे अपयशी ठरला आहे. विकी कौशलचा ‘छावा’ मात्र रिलीजच्या ७ आठवड्यानंतरही प्रेक्षकांचं थिएटर्समध्ये मनोरंजन करत आहे.

‘सिकंदर’चे शो रद्द

प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिल्याने ‘छावा’ यंदाचा सर्वाधिक कमाई करणारा ब्लॉकबस्टर सिनेमा ठरला आहे. तर दुसरीकडे सलमान खानच्या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर वाईट कामगिरी केली आहे. दरवर्षी ईदला प्रेक्षकांना भाईजानच्या चित्रपटाबद्दल उत्सुकता असते, मात्र ‘सिकंदर’ने आणि भाईजानने यंदा प्रेक्षकांची निराशा केली आहे. हा चित्रपट १०० कोटींचा टप्पा गाठण्यासाठी धडपडत असल्याचं दिसतंय. चित्रपटाला प्रेक्षक मिळत नसल्याने अनेक ठिकाणी शो रद्द केले जात आहेत.

इंडस्ट्री ट्रॅकर सॅकनिल्कने दिलेल्या माहितीनुसार, सिकंदरने पहिल्या शनिवारी फक्त ४ कोटी रुपये कमावले, जे शुक्रवारी ३.५ कोटी रुपयांच्या तुलनेत किंचित जास्त होते. ‘सिकंदर’ने पहिल्या दिवशी २६ कोटी रुपयांची कमाई केली होती, पण त्या तुलनेत नंतर मात्र चित्रपट कमाईचा दुहेरी आकडा गाठू शकला नाही. यावरून हा चित्रपट प्रेक्षकांनी नाकारल्याचं स्पष्ट होत आहे.

‘छावा’ने पहिल्या आठवड्यात २१९.२५ कोटी रुपयांचे कलेक्शन केले होते. या तुलनेत अलीकडे रिलीज झालेल्या स्त्री 2, जवान आणि ॲनिमलने अनुक्रमे अंदाजे २७५ कोटी, ३९० कोटी आणि ३३७.५० कोटी रुपये कमावले होते.

छावाचा ऑक्युपेन्सी रेट जास्त

‘सिकंदर’चा ऑक्युपेन्सी रेट सातव्या दिवशी फक्त ८.९३ टक्के होता. साधारणपणे वीकेंडला चित्रपटांच्या कलेक्शन व ऑक्युपेन्सी रेटमध्ये वाढ होते, पण ‘सिकंदर’च्या बाबतीत मात्र उलटंच घडलंय. दुसरीकडे आता ‘छावा’चा रिलाजनंतरचा आठवा आठवडा सुरू झाला आहे. ५१ व्या दिवशी या चित्रपटाचा ऑक्युपेन्सी रेट १३.३२ टक्के राहिला, जो ‘सिकंदर’च्या सातव्या दिवसाच्या तुलनेने खूप जास्त आहे. ‘छावा’ने ५१ व्या दिवशी ९० लाख रुपये कमावले. यावरून प्रेक्षक ‘सिकंदर’कडे पाठ फिरवत असून छत्रपती संभाजी महाराजांवरील ‘छावा’ पाहण्यासाठी चित्रपटगृहांमध्ये परतत असल्याचं दिसत आहे.

‘छावा’चे कलेक्शन दिवसेंदिवस वाढतच आहे. लवकरच हा चित्रपट भारतात ६०० कोटींचा टप्पा गाठेल असं दिसतंय. या चित्रपटाने देशभरात आतापर्यंत ५९७.१५ कोटी रुपये कमावले आहेत. चित्रपट प्रदर्शित होऊन सात आठवडे झाले आहेत, अजूनही चित्रपट सिनेमागृहांमध्ये चालतोय. ‘छावा’ लवकरच ओटीटीवर येईल, अशी चर्चा आहे. मात्र अद्याप निर्मात्यांनी तारीख जाहीर केलेली नाही.