रामजन्मभूमीत म्हणजेच अयोध्या येथे प्रभास आणि क्रीती सनोन यांच्या आगामी ‘आदिपुरुष’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला. सोशल मिडियावर या चित्रपटाच्या टीझरला चांगलंच ट्रोल केलं जात आहे. चित्रपटातील स्पेशल इफेक्ट आणि व्हीएफएक्स याबाबतीत नेटकऱ्यांनी चित्रपट निर्मात्यांना चांगलंच धारेवर धरलं आहे. चित्रपटातील व्हीएफएक्स हे कार्टून फिल्मसारखे वाटत असून काही दृश्यं इतर चित्रपटांमधून चोरल्याचे आरोपही प्रेक्षकांनी लावले आहेत.
आता तर प्रेक्षकांनी या चित्रपटातील व्हीएफएक्सची तुलना थेट ‘ब्रह्मास्त्र’शी केली आहे. गेल्याच महिन्यात प्रदर्शित झालेल्या ‘ब्रह्मास्त्र’बद्दलही अशीच चर्चा रंगली होती. त्यातील स्पेशल इफेक्टही प्रेक्षकांच्या पसंतीस पडले नव्हते. चित्रपटाने कमाई जरी चांगली केली असली तरी ‘ब्रह्मास्त्र’वर टीका ही कायम होतच होती.
आणखी वाचा : सैफ अली खानचा ‘रावण’ पाहून प्रेक्षकांचा राग अनावर, कुणी तैमूरशी तर कुणी खिलजीशी केली तुलना
नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘आदिपुरुष’च्या टीझरने मात्र लोकांचं मत बदललं आहे. ‘आदिपुरुष’पेक्षा ‘ब्रह्मास्त्र’मधील स्पेशल इफेक्ट उत्तम असल्याची चर्चा सोशल मीडियावर होत आहे. दोन्ही चित्रपटांचं बजेट जवळपास सारखंच आहे तरी या दोन्ही चित्रपटांच्या स्पेशल इफेक्टमध्ये दिसणारा फरक प्रेक्षकांना जाणवला आहे. सोशल मीडियावर वेगवेगळे फोटोज घेऊन त्यांची तुलना करून या दोन्ही चित्रपटातला फरक दाखवला जात आहे. शिवाय “अयान मुखर्जी तुला सलाम” असंही प्रेक्षक म्हणताना दिसत आहेत.
‘ब्रह्मास्त्र’ हा अयान मुखर्जीचा पहिलाच प्रयोग होता, तरी त्याचं काम उत्तम असून अजय देवगणबरोबर ‘तान्हाजी’सारख्या चित्रपट देणाऱ्या ओम राऊतकडून ही अपेक्षा नव्हती असं लोकं म्हणत आहेत. ‘ब्रह्मास्त्र’मध्येही वानरास्त्र दाखवलं आहे पण ‘आदिपुरुष’मधील वानरसेना ही फार हास्यास्पद आहे असंही लोकांनी म्हंटलं आहे. एकूणच या ‘आदिपुरुष’पेक्षा ‘ब्रह्मास्त्र’ कित्येक पटीने चांगला होता असं प्रेक्षकांचं म्हणणं आहे. आता ‘आदिपुरुष’ हा चित्रपट ‘ब्रह्मास्त्र’चे विक्रम तोडू शकेल की नाही हे चित्रपट प्रदर्शित झाल्यावरच कळेल.