बॉलीवूडवर ९० च्या दशकात अंडरवर्ल्डचा मोठा प्रभाव असल्याचे दिसते. अनेक कलाकारांनी याबद्दल खुलेपणाने वक्तव्यदेखील केले आहे. आता पत्रकार आणि लेखक हुसैन जैदी यांनी नुकत्याच एका मुलाखतीत अंडरवर्ल्डचा डॉन दाऊद इब्राहिम(Dawood Ibrahim)चे बॉलीवूडच्या कलाकारांशी, निर्माते व दिग्दर्शकांशी जवळचे संबंध होते, असा खुलासा केला आहे. ऋषी कपूर आणि दिलीप कुमार हे प्रसिद्ध कलाकारही दाऊद इब्राहिमशी संबंधित होते. एक काळ असा होता की दाऊद इब्राहिमबरोबर संबंध असणे अभिमानाचे मानले जात असे.
दाऊद इब्राहिमला बॉलीवूडविषयी…
पिंकविलाला नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत हुसैन यांनी म्हटले की, त्या काळातील अनेक बॉलीवूडमधील नामांकित व्यक्तींशी दाऊदचे चांगले संबंध होते. ते दुबईत भेटत असत. दाऊद इब्राहिमला बॉलीवूडविषयी उत्सुकता होती. यावर अधिक बोलताना हुसैन म्हणाले, “दाऊदला फिल्म इंडस्टीमधून पैसा कमवायचा नव्हता, त्याला हिंदी सिनेमे आवडायचे, त्याला नायिका आवडायच्या. जे कलाकार दुबईला जात असत, दाऊद त्यांच्यासाठी जेवणाची व्यवस्था करीत असे. दिलीप कुमार, ऋषी कपूर, अमजद खान यांनी त्यांच्या मुलाखतीत दाऊदला भेटल्याचे वक्तव्य केले आहे. दाऊद या कलाकारांना महागड्या भेटवस्तूदेखील देत असे, त्यामुळे पैसे कमावण्यासाठी त्याला हिंदी सिनेसृष्टीत रस नव्हता; तर तो या कलाकारांना मित्रांच्या स्वरूपात बघत असे.”
यावर अधिक बोलताना ते म्हणाले, “दाऊद सगळ्यांना ओळखायचा. अभिनेते, अभिनेत्री, दिग्दर्शक, निर्माते सगळे त्याला माहीत असत. त्यावेळी लोक दाऊदबरोबरच्या मैत्रीबद्दल अभिमानाने सांगायचे. मी कोणाचेही नाव घेणार नाही, पण ते असे म्हणायचे की मी आताच भाईबरोबर फोनवर बोललो. त्याच्याबरोबर संपर्कात असणे, त्यावेळी कोणालाही चुकीचे वाटत नसे.”
हुसैन यांनी जेव्हा दाऊदची मुलाखत घेतली होती, तेव्हा त्यांनी त्याला प्रश्न विचारलेला की तू इंडस्ट्रीमध्ये दशहत का पसरवत आहेस? त्यावर दाऊदने म्हटले होते की, माझं चित्रपटसृष्टीवर प्रेम आहे, त्यांना माझ्यापासून घाबरण्याची गरज नाही. मात्र, अबू सालेमपासून चित्रपट निर्मात्यांकडून मोठ्या प्रमाणात पैसे वसूल करण्याची पद्धत सुरू झाली.
दाऊदने काळा पैसा पांढरा करण्यासाठी बॉलीवूडचा कसा वापर केला, याबद्दल हुसैन म्हणाले की, फिल्म इंडस्ट्रीच्या चित्रपटांना निर्माता म्हणून फंड देत नसे, तर तो त्यांना कर्ज देत असे. लोक दाऊदचे पैसे घेऊन ते त्यांच्या चित्रपटांमध्ये गुंतवत असत आणि अशा प्रकारे त्याचा काळा पैसा पांढरा होत असे.
दरम्यान, जेव्हा मुंबई पोलिसांना दाऊद आणि बॉलीवूडच्या कनेक्शनविषयी माहीत झाल्यानंतर परिस्थिती बदलली. बॉलीवूडमधील लोकांनी दाऊदशी हळूहळू संबध तोडले आणि त्याच्याशी संपर्क करणे बंद केले. याआधी राकेश रोशन यांनी अंडरवर्ल्डने त्यांच्यावर गोळीबार केल्याचे अनेक मुलाखतींमध्ये सांगितले आहे.