Saif Ali Khan : अभिनेता सैफ अली खानवर मागील आठवड्यात हल्ला झाला. १६ जानेवारीला त्याच्या घरात चोरीच्या उद्देशाने घुसलेल्या दरोडेखोराने अभिनेत्यावर चाकूने वार केले. या हल्ल्यात सैफ गंभीर जखमी झाला होता. सैफला रक्तबंबाळ अवस्थेत रिक्षातून रुग्णालयात नेण्यात आलं होतं. त्याला रुग्णालयात नेणाऱ्या रिक्षा चालकाचं खूप कौतुक झालं, त्याला बक्षीसही देण्यात आले होते. पण आता मात्र तो रिक्षा चालक वैतागला आहे.
सैफवर हल्ला झाल्यानंतर त्याला रिक्षातून लिलावती रुग्णालयात नेण्यात आलं होतं. सैफबरोबर एक कर्मचारी व मुलगा तैमूर रुग्णालयात गेले होते. त्याला रिक्षातून रुग्णालयात नेणाऱ्या चालकाचे नाव भजन सिंह आहे. त्याने आता लोक सतत प्रश्न विचारत असल्याने नाराजी व्यक्त केली आहे. लोक सारखे त्याच घटनेबद्दल विचारतात, त्यामुळे काम करू शकत नाही, झोपू शकत नाही, असं त्याने म्हटलं आहे.
“मी घाबरलोय कारण लोक वारंवार त्याबद्दल (सैफला रुग्णालयात नेतानाचा प्रसंग) प्रश्न विचारतात. लोकांनी मला वारंवार त्याबद्दल विचारावं अशी माझी इच्छा नाही. आता मी झोपू शकत नाहीये, कामही करू शकत नाहीये, रोज इंटरव्ह्यू द्यायलाही मला आवडत नाहीये. जे व्हायचं होतं ते झालं. मी कुणाचा तरी जीव वाचवला, मला त्या व्यक्तीला (सैफला) भेटण्याची संधी मिळाली, त्या गोष्टीचा मला खूप आनंद आहे,” असं भजन सिंहने इन्स्टंट बॉलीवूडला सांगितलं.
सैफला रुग्णालयात नेताना काय घडलं होतं?
“मी रिक्षा घेऊ जात होतो आणि अचानक मला गेटमधून आवाज आला. मुख्य गेटजवळ एक महिला मदतीसाठी ‘रिक्षा थांबवा’ म्हणत ओरडत होती. सुरुवातीला मला तो सैफ अली खान आहे हे माहीत नव्हतं. मला वाटलं की कोणत्यातरी सामान्य व्यक्तीवर हल्ला झाला आहे,” असं भजन सिंह म्हणाला होता.
“ते (सैफ अली खान) स्वत: माझ्याकडे चालत आले आणि रिक्षामध्ये बसले. ते जखमी अवस्थेत होते. त्यांच्याबरोबर एक लहान मूल आणि आणखी एक व्यक्ती होती. माझ्या ऑटोमध्ये बसल्यानंतर लगेचच सैफ अली खानने मला रुग्णालयात पोहोचायला किती वेळ लागेल असं विचारलं. त्यांच्या मानेतून आणि पाठीतून रक्तस्त्राव होत होता. त्याचा पांढरा कुर्ता लाल झाला होता, आणि खूप रक्तस्त्राव होत होता. मी भाडंही घेतलं नाही. त्यावेळी मी त्यांना मदत करू शकलो,” असं त्याने म्हटलं होतं.