Saif Ali Khan : बॉलीवूड अभिनेता सैफ अली खानने त्याला वेळेत लिलावती रुग्णालयात पोहोचवणारा रिक्षा चालक भजन सिंह राणाचे आभार मानले आहेत. रक्तबंबाळ अवस्थेत असलेल्या सैफला भजन सिंहने रुग्णालयात नेलं होतं, त्याने भाडं देखील घेतलं नव्हतं. वेळेवर केलेल्या मदतीबद्दल सैफने आभार मानले आणि आर्थिक मदत देऊ केली, असं चालकाने पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं. मात्र, सैफने किती आर्थिक मदत केली, ते अद्याप अस्पष्ट आहे. त्याला ५० हजार रुपये दिले असं, म्हटलं जात आहे; पण रकमेबाबत खुलासा करण्यास राणाने नकार दिला. तो मूळचा उत्तराखंडचा रहिवासी आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“मी त्याला (सैफ) वचन दिलं आहे आणि मी ते पाळेन. लोकांना पैशांबाबत जे अंदाज बांधायचे आहेत ते बांधू द्या,” असं राणा रकमेबद्दल म्हणाला. “त्याने (सैफ) मला ५०,००० किंवा १,००,००० रुपये दिले असं लोकांना म्हणू द्या, पण मी रक्कम सांगू इच्छित नाही. त्याने मला विनंती केली आहे की मी ही माहिती शेअर करू नये आणि मी त्याला दिलेले माझे वचन पाळेन,” असं राणाने नमूद केलं. तो खारमध्ये चार इतर रूममेट्ससह एका खोलीत राहतो. त्याला फैजान अन्सारी नावाच्या सामाजिक कार्यकर्त्याने सैफची मदत केल्याबद्दल ११,००० रुपये बक्षीस दिलं, असंही त्याने सांगितलं.

शर्मिला टागोर यांच्या पाया पडला भजन सिंह राणा

मंगळवारी संध्याकाळी सैफला डिस्चार्ज देण्यात आला. त्यापूर्वी सैफ व त्याच्या कुटुंबाने राणाची भेट घेतली. राणाने सैफची आई ज्येष्ठ अभिनेत्री शर्मिला टागोर यांच्या पाया पडून आशीर्वाद घेतले. त्याचे कुटुंबीय खूप प्रेमाने वागले, सर्वांबरोबर फोटोही काढले, असं त्याने सांगितलं. “मी मंगळवारी सैफला रुग्णालयात भेटलो. त्याने आभार मानायला रुग्णालयातून फोन केला होता, त्याने माझे कौतुक केले. मला त्याच्या आणि त्याच्या कुटुंबाकडून खूप आशीर्वाद मिळाले. त्याने मला त्याच्या आईशी (शर्मिला टागोर) ओळख करून दिली आणि मी त्यांच्या पाया पडलो. त्याला योग्य वाटलं तेवढी रक्कम त्याने मला दिली, तसेच मला केव्हाही मदतीची गरज असेल तर तो करेल, असं आश्वासन दिलं,” असं राणा म्हणाला. राणाने सैफला रिक्षातून रुग्णालयात नेल्याच्या बातमीनंतर मीडिया, मित्र आणि नातेवाईकांकडून त्याला खूप फोन येत आहेत.

१५ वर्षांपासून रिक्षा चालवतोय

“माझ्यासाठी तो नेहमीसारखाच कामाचा दिवस होता. बरेचदा मी रात्री ऑटो चालवतो. मी १५ वर्षांपासून हा व्यवसाय करतोय, पण माझ्या ऑटोने कधीही एखाद्या सेलिब्रिटीने प्रवास केला नव्हता. सैफला रुग्णालयात नेल्यापासून माझं आयुष्य बदललं आहे. आता लोक मला माझ्या नावाने आणि चेहऱ्याने ओळखतात,” असं राणाने सांगितलं. तो दरमहा १०,००० ते २०,००० रुपये कमावतो.

सैफ अली खानवर १६ जानेवारी रोजी त्याच्या १२ व्या मजल्यावरील अपार्टमेंटमध्ये दरोड्याच्या प्रयत्नात हल्ला करण्यात आला. आरोपीने त्याच्यावर चाकूने अनेक वार केले होते, त्यामुळे सैफवर शस्त्रक्रियादेखील करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी घुसखोराला अटक केली आहे, त्याचे नाव शरीफुल इस्लाम शहजाद मोहम्मद रोहिल्ला अमीन फकीर असे आहे. तो ३० वर्षीय बांगलादेशी नागरिक आहे जो गेल्या वर्षी बेकायदेशीरपणे भारतात आला होता. तो भारतात विजय दास हे खोटं नाव वापरून राहत होता. तो सध्या पोलीस कोठडीत आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Auto driver who rushed saif ali khan refused to disclose amount he got from kareena kapoor family hrc