चित्रपटांच्या शूटिंगदरम्यान अभिनेत्रींना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. एखाद्या चित्रपटात इंटिमेट सीन दाखवायचे असतील किंवा बलात्काराचा सीन असेल तर त्याचं शूटिंग करणं अभिनेत्रींसाठी खूप अवघड असतं. आता सेटवर इंटिमेसी को-ऑर्डिनेटर असतात, पण काही वर्षांपूर्वीपर्यंत ही संकल्पना नव्हती.

एका बॉलीवूड अभिनेत्रीला न सांगता बलात्काराचा सीन शूट करण्यात आला होता. तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण हे खरं आहे. ९० च्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्री आयशा जुल्काने अक्षय कुमारसह अनेक आघाडीच्या अभिनेत्यांबरोबर काम केलं आहे. ३२ वर्षांपूर्वी १९९३ मध्ये तिच्याबरोबर एक प्रसंग घडला होता. ‘दलाल’ नावाच्या चित्रपटात आयशाची (Ayesha Jhulka Dalaal movie controversy) मुख्य भूमिका होती. हा चित्रपट सुपरहिट ठरला होता, पण यामुळे आयशा मात्र वादात सापडली होती.

निर्मात्यांनी आयशाला काहीच सांगितलं नव्हतं

‘दलाल’मध्ये एक सीन होता, ज्याबद्दल दिग्दर्शक व निर्मात्यांनी आयशाला काहीच सांगितलं नाही. बलात्काराचा सीन तिच्या बॉडी डबलबरोबर शूट केला. या चित्रपटाचा ट्रायल झाल्यावर एका रिपोर्टरने आयशाला फोन करून या सीनबद्दल विचारलं. तू इतका बोल्ड सीन कसा केलास? हा प्रश्न ऐकताच आयशाला धक्का बसला होता.

भडकलेल्या आयशाने केलेली तक्रार

‘दलाल’चे दिग्दर्शक पार्थो घोष यांनी आयशाला न सांगता तिच्या बॉडी डबलबरोबर बलात्काराचा सीन शूट केला. या सीनमध्ये तिच्या अंगावर खूप तोकडे कपडे होते. आयशाला या सीनबद्दल समजल्यावर ती खूप भडकली होती. नाराज आयशाने इंडियन मोशन पिक्चर प्रोड्यूसर्स असोसिएशनमध्ये तक्रार दिली, कारण ही फसवणूक असल्याचं तिचं म्हणणं होतं. निर्मात्यांनी व दिग्दर्शकाने न सांगता केलं ते चुकीचं आहे असं ती म्हणाली होती. आयशाने हिंदी रशला दिलेल्या एका मुलाखतीत या सीनबद्दल सांगितलं होतं.

दरम्यान, ‘दलाल’मध्ये आयशा जुल्काबरोबर अभिनेते मिथुन चक्रवर्तीदेखील होते. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला होता. दरम्यान, आता आयशा इंडस्ट्रीत फारशी सक्रिय नाही. ती सहाय्यक भूमिका साकारताना दिसते. ती सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. तिचे लाखो चाहते आहेत. ती सोशल मीडियावर पोस्ट करून चाहत्यांना वैयक्तिक व व्यावसायिक आयुष्याबद्दल अपडेट देत असते.