प्रभू रामचंद्राच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा आज (२२ जानेवारी) अयोध्येत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते पार पडली. पंतप्रधानांनी १२ वाजून २९ मिनिटांनी प्राणप्रतिष्ठेला सुरुवात केली. त्यांच्यासह उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, सरसंघचालक मोहन भागवतही होते. याशिवाय या सोहळ्यासाठी काही दिग्गज बॉलीवूड कलाकारांनाही आमंत्रित करण्यात आलं होतं. विविध क्षेत्रातील मान्यवरांसह बॉलीवूडमध्ये बहुतांश सेलिब्रिटी या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार झाले.
प्रभू रामाच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यासाठी अयोध्येत गेल्या अनेक दिवसांपासून जोरदार तयारी सुरु होती. आज प्राणप्रतिष्ठेसाठी संपूर्ण अयोध्यानगरी सजवण्यात आली होती. आलिया भट्ट, रणबीर कपूर, विकी कौशल, कतरिना कैफ, रोहित शेट्टी, आयुष्मान खुराना, माधुरी दीक्षित व तिचे पती डॉ. श्रीराम नेने हे कलाकार राम मंदिराच्या उद्घाटनासाठी सकाळीच मुंबईतून रवाना झाले होते.
हेही वाचा : शोएब मलिकशी दुसरं लग्न केल्यावर सना जावेदची पहिली पोस्ट; नेटकरी म्हणाले, “सानिया मिर्झासाठी…”
अयोध्येत बॉलीवूडचे सगळे कलाकार पारंपरिक वेशात गेले होते. प्रभू श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा झाल्यावर या कलाकारांनी मंदिराच्या परिसरात अनेक सेल्फी घेतले. यातील माधुरी दीक्षितच्या पतीने बॉलीवूड कलाकारांसह घेतलेला एक सेल्फी सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. या फोटोमध्ये सगळे कलाकार उत्साहात असल्याचं पाहायला मिळत आहे.
दरम्यान, ५०० वर्षांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर पंतप्रधानांनी विधीवत पूजा करून अयोध्येच्या राममंदिरात रामल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना केली आहे. रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर हेलिकॉप्टरमधून राम मंदिरावर पुष्पवृष्टी करण्यात आली. या सोहळ्यासाठी अयोध्येत विविध क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावली होती.