मागच्या बऱ्याच काळापासून चर्चेत असलेल्या ‘ड्रीम गर्ल २’ चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. आपल्या आवाजाच्या जादूने सर्वांना वेड लावणारी पूजा ‘ड्रीम गर्ल २’मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून याची खास झलक चित्रपटाच्या टीझरमध्ये दिसत आहे. पूजाच्या भूमिकेत बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता दिसणार आहे मात्र टीझरमध्ये त्याचा चेहरा दाखवण्यात आलेला नाही. सध्या सोशल मीडियावर या चित्रपटाच्या टीझरची बरीच चर्चा होताना दिसत आहे.
टीझरमध्ये पूजा ‘पठाण’ म्हणजेच शाहरुख खानशी बोलताना दिसत आहे. पूजाचा फोन वाजतो आणि ती फोन रिसिव्ह करून बोलते, “हॅलो, मी पूजा बोलतेय, तुम्ही कोण?” त्यावर पलिकडून शाहरुखचा आवाज येतो, “पूजा, मी पठाण.” हे ऐकून पूजा म्हणते, “उफ्फ, कसा आहे माझा पठाण.” तर शाहरुख तिला म्हणतो, “आधीपेक्षा जास्त श्रीमंत, हॅप्पी व्हेलेंटाईन्स डे पूजा.” यानंतर पुढे त्यांचं काय बोलणं होतं हे पाहण्यासाठी तुम्हाला हा ट्रेलर पाहावाच लागेल.
आणखी वाचा- “तुला जन्मजात अभिनेत्री म्हणून…”, अनुपम खेर यांची आलिया भट्टसाठी खास पोस्ट
‘ड्रीम गर्ल २’च्या टीझरची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होताना दिसत आहे. या टीझरमध्ये पूजा कॉल सेंटर सोडून थेट ‘पठाण’शी बोलताना दिसत आहे. टीझरमध्ये पूजा खूपच वेगळ्या आणि मॉडर्न लूकमध्ये दिसत आहे आणि ही भूमिका बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता आयुष्मान खुरानाने साकारली आहे. टीझरमध्ये त्याचा चेहरा पूर्णपणे दाखवण्यात आलेला नाही. मात्र त्याची झलक अशाप्रकारे दाखवण्यात आली आहे की प्रेक्षकांची चित्रपटाबाबतची उत्सुकता वाढली आहे.
आणखी वाचा- व्हॅलेंटाईन डेला परश्याची चाहत्यांसाठी खास भेट, ‘घर बंदूक बिरयानी’चं रोमँटिक गाणं प्रदर्शित
दरम्यान अभिनेता आयुष्मान खुरानाचा हा चित्रपट येत्या ७ जुलैला म्हणजे शाहरुख खानच्या जवान चित्रपटाबरोबरच प्रदर्शित होणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार या चित्रपटात अनन्या पांडे, परेश रावल, राजपाल यादव, असरानी, विजय राज, मनोज जोशी, सीमा पाहवा, अभिषेक बॅनर्जी आणि मनज्योत सिंह यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका असणार आहेत. चित्रपटाचं दिग्दर्शन राज शांडिल्य करत आहेत तर एकता कपूर या चित्रपटाची निर्माती आहे.