बॉलीवूड अभिनेता आयुष्मान खुरानाने ‘विकी डोनर’ चित्रपटातून पदार्पण करीत आपल्या करिअरला सुरुवात केली होती. यानंतर वैविध्यपूर्ण भूमिकांमुळे अल्पावधीतच त्याने प्रेक्षकांची पसंती मिळवली. आयुष्मानने आजवर नेहमी वेगवेगळ्या भूमिका करण्याला प्राधान्य दिले आहे. परंतु सध्या त्याच्या नावाची चर्चा रंगली असून लहानपणी त्याच्या घरच्यांनी वेगळेच नाव ठेवले होते, असा खुलासा आयुष्मानने एका मुलाखतीदरम्यान केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : रणबीर आणि रणवीरच्या बॉलीवूड पदार्पणानंतर घाबरला होता आयुष्मान, म्हणाला…

अभिनेता आयुष्मान खुरानाने अलीकडेच एबीपी माझा वृत्तवाहिनीच्या ‘महाकट्टा’ कार्यक्रमाला हजेरी लावली होती. या वेळी आयुष्मानला त्याचे नाव कोणी ठेवले? या सुंदर नावाचा विचार तुझ्या वडिलांनी केला होता का? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर आयुष्मान म्हणाला, “लहानपणी सुरुवातीला माझे नाव ‘निशांत’ असे ठेवण्यात आले होते. माझ्या वयाची सुरुवातीची तीन वर्षे माझे नाव ‘निशांत’ असेच होते, परंतु शाळेत जाण्यापूर्वी माझे नाव बदलून ‘आयुष्मान’ असे ठेवण्यात आले. अलीकडे खूप लोकांनी आपल्या मुलांचे नाव आयुष्मान असे ठेवले असेल, पण मला वाटते, मी जेव्हा लहान होतो तेव्हा एवढे युनिक नाव कोणाचेच नव्हते, माझ्या शाळेतही कोणाचेच असे वेगळे नाव नव्हते.” त्याचे हे उत्तर ऐकून सर्वांनीच आश्चर्य व्यक्त केले.

हेही वाचा : १२ फ्लॉप चित्रपटानंतर अमिताभ रातोरात झाले स्टार; ‘तो’ सुपरहिट सिनेमा ५० वर्षांनी ओटीटीवर होणार रिलीज!

आयुष्मानला त्याच्या घरातील वातावरण आणि बालपणाबद्दल विचारले असता तो म्हणाला, “लहानपणापासून माझे वडील आणि आजी या दोघांचा माझ्यावर सर्वाधिक प्रभाव होता. मी आज जेवढा क्रिएटिव्ह आहे त्याचे संपूर्ण श्रेय माझ्या आजीला जाते. माझ्यामधील कलेला घरच्यांनी नेहमीच प्रोत्साहन दिले. तेव्हा आजूबाजूचे सगळे लोक त्यांना सांगायचे, तुम्ही त्याला कशाला परवानगी देताय? त्यापेक्षा अभ्यास करायला सांगा. परंतु माझ्या वडिलांनी मला आधीच सांगितले होते, तुला थिएटर करायचे असेल तर कॉलेजमध्ये पूर्ण हजेरी लावून परीक्षेतसुद्धा चांगली कामगिरी केली पाहिजे. अभ्यासाकडे दुर्लक्ष न करता तू कलेची जोपासना कर. ही शिकवण वडिलांकडून मिळाली होती.”

आयुष्मान खुराना लवकरच ‘ड्रीम गर्ल २’ या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून यामध्ये त्याची सहकलाकार अनन्या पांडे असेल.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ayushmann khurrana real name is different his parents change his name when he was 3 years old sva 00