Tahira Kashyap Breast Cancer Relapse : अभिनेता आयुष्मान खुरानाची पत्नी, चित्रपट निर्माती व लेखिका ताहिरा कश्यपला पुन्हा कर्करोगाचे निदान झाले आहे. ४२ वर्षीय ताहिराने २०१८ मध्ये ब्रेस्ट कॅन्सरवर मात केली होती, आता पुन्हा एकदा तिला स्तनाचा कर्करोग झाला आहे. ताहिराने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून ही माहिती दिली. या कठीण काळात ताहिराचे चाहते सोशल मीडियावर कमेंट्स करून तिला धीर देत आहेत.
ताहिराने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर केली आहे. ज्यात तिला पुन्हा कर्करोग झाल्याची माहिती तिने दिली आहे. “सात वर्षांच्या नियमित तपासणीची शक्ती. खरं तर हा एक दृष्टीकोन आहे. ज्यांना नियमित मॅमोग्रामची गरज आहे, त्या सर्वांना मी हेच सुचवेन. माझ्यासाठी दुसरा राउंड…मला पुन्हा कर्करोगाचं निदान झालंय,” असं ताहिराने पोस्टमध्ये लिहिलं आहे.
पाहा पोस्ट-
ताहिराने पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिलं, “जेव्हा आयुष्याकडून तुम्हाला लिंबू मिळतं, तेव्हा त्यापासून लिंबूपाणी बनवा. जेव्हा पुन्हा एकदा लिंबू मिळतं, तेव्हा शांतपणे तुमच्या आवडत्या ‘काला खट्टा’मध्ये मिसळा आणि चांगल्या हेतूने ते प्या. कारण एकतर हे चांगलं आहे आणि दुसरं म्हणजे तुम्ही पुन्हा एकदा बेस्ट देणार हे तुम्हाला माहीत असतं. नियमित तपासणी करा. मॅमोग्रामला घाबरू नका. स्तनाचा कर्करोग पुन्हा एकदा.”
ताहिराला २०१८ मध्ये स्तनाच्या कर्करोगाचे निदान झाले होते. त्यानंतर तिने उपचार घेऊन यावर मात केली. नंतर ताहिराने याबद्दल जनजागृती केली आणि ती तिच्या कर्करोगाच्या प्रवासाविषयी मोकळेपणाने बोलताना दिसली. तिने स्तनांच्या कॅन्सरच्या उपचारादरम्यान शरीरावर झालेल्या खुणा दाखवल्या होत्या. जागतिक कर्करोग दिनानिमित्त ताहिराने उपचारादरम्यान केस गेले तेव्हाचे टक्कल असलेले फोटो पोस्ट केले होते.
ताहिरा कश्यपच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास तिने ‘पिन्नी और टॉफी’ ही शॉर्ट फिल्म दिग्दर्शित केली होती. तसेच ‘शर्मा जी की बेटी’चं दिग्दर्शनही तिने केलं होतं. या चित्रपटात दिव्या दत्ता व सैयामी खेर हे कलाकार होते.