बॉलीवूड अभिनेते दलिप ताहिल यांना दंडाधिकारी न्यायालयाने मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवून रिक्षाला धडक दिल्याबद्दल दोषी ठरवलं आहे. याशिवाय त्यांना दोन महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. ही घटना २०१८ मध्ये खार येथे घडली होती. याप्रकरणी रिक्षातील प्रवासी महिलेने पोलिसांत तक्रार दाखल केली होती.
२०१८ मध्ये गणेश विसर्जनाच्या दिवशी ताहिल सांताक्रूझ परिसरातून मद्यधुंद अवस्थेत गाडीने प्रवास करत होते. यावेळी त्यांनी एका रिक्षाला धडक दिली. रिक्षाला धडक दिल्यानंतर ताहिल यांनी घटनास्थळावरून पळ काढला होता, मात्र गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीत वाहतूक कोंडी झाल्याने ते काही वेळातच पकडले गेले. रिक्षात प्रवास करणाऱ्या महिलेने याप्रकरणी अभिनेत्याला जाब विचारला असता त्यांनी धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न केला. यानंतर रिक्षा चालक आणि महिलेने याबाबत पोलिसांना माहिती देऊन तक्रार दाखल केली होती. मात्र, त्यानंतर अभिनेत्याची जामिनावर सुटका करण्यात आली होती.
आता पाच वर्षांनंतर डॉक्टरांनी सादर केलेल्या पुराव्यांच्या आधारे २०१८ मध्ये घडलेल्या या ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणी ताहिल यांना दोषी ठरवून त्यांना दोन महिन्यांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. अभिनेत्याने त्यावेळी ब्लड टेस्ट करण्यास नकार दिला होता. शिवाय त्यानंतर ते नशेत असल्याचंही समोर आलं होतं.
हेही वाचा : २० वा आशियाई चित्रपट महोत्सव: समकालीन प्रादेशिक आणि मराठी चित्रपट स्पर्धेसाठी अर्ज भरण्याचे आवाहन
दरम्यान, ताहिल यांच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर, दलिप ताहिल हे ९० च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेते होते. त्यांनी ‘बाजीगर’, ‘राजा’, ‘इश्क’, ‘रावन’, ‘कहो ना प्यार है’ यांसारख्या अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केलं आहे.