दोन वर्षांपूर्वी बॉलिवूड अभिनेता इरफान खानच्या निधनाची बातमी ऐकल्यावर आपण सगळेच सुन्न झालो होतो. इरफान एका दुर्धर आजाराशी झुंज देत होता, पण इतक्या लवकर तो आपला निरोप घेईल असे कोणालाच वाटले नव्हते. आज इरफान खानची जयंती. आज इरफानने ५५ व्या वर्षात पदार्पण केलं असतं. इरफानच्या जाण्याने मनोरंजनसृष्टीत कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे.
इरफानचा मुलगा बाबील खानसुद्धा सध्या अभिनय क्षेत्रात नशीब आजमावू पहात आहे. नुकताच त्याचा ‘कला’ हा चित्रपट नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला. चित्रपट फारसा हीट ठरला नसला तरी यातील गाणी, तृप्ती दीमरीचं काम आणि बाबीलच्या सहज अभिनयाची प्रचंड प्रशंसा झाली.
आणखी वाचा : “त्याने माझ्या डोक्यात बाटली फोडली हे…” सलमान खानची एक्स गर्लफ्रेंड सोमी अलीचा खुलासा
या चित्रपटाच्या निमित्ताने मध्यंतरी ‘फिल्म कम्पॅनियन’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये बाबीलने त्याच्या आणि इरफानच्या नात्याबद्दल खुलासा केला आहे. त्यांच्यातील नातं हे खूप मैत्रीपूर्ण होतं, पण त्याआधी बाबीलने तब्बल वर्षंभर इरफानशी संवाद बंद केला होता, याबद्दलही त्याने स्पष्टीकरण दिलं आहे. बाबील जेव्हा १६ वर्षाचा होता तेव्हा त्याने स्वतःच्या वैयक्तिक स्वातंत्र्य मिळावं या त्याच्या मतावर ठाम होता. इरफान मात्र याच्या विरोधात होता. इरफानच्या मते बाबील अजूनही लहानच होता. त्यामुळे त्याने स्वतंत्र होऊन स्वतःचे निर्णय घेणं इरफानला पटणारं नव्हतं.
या गोष्टीमुळे बाबील आणि इरफानच्या नात्यात थोडा दुरावा आला हे त्यानेच कबूल केलं, त्यानंतर जवळ जवळ वर्षभर बाबील इरफानशी बोलत नव्हता. अखेर एके दिवशी इरफानला ही जाणीव झाली, तो स्वतः जाऊन बाबीलला भेटला आणि त्याने त्याला एकदम घट्ट मिठी मारली आणि म्हणाला, “तू खरंच खूप मोठा झाला आहेस.” यानंतर या दोघांमधील नातं आणखी खुलत गेलं. बाबीलने बऱ्याचदा इरफानबरोबर चित्रपटात काम करायची इच्छादेखील व्यक्त केली होती.