हिंदी मालिका आणि चित्रपटांतून मोठी प्रसिद्धी मिळवलेले राम कपूर सध्या सोशल मीडियावर चर्चेत आले आहेत. याचं कारण म्हणजे त्यांनी कमी केलेलं वजन. राम कपूर यांनी थेट ५५ किलो वजन कमी केलं आहे. तसेच फिटनेसवर लक्ष देत स्वत:ची शरीरयष्टी पीळदार बनवली आहे. वजन कमी केल्यानंतर ते सातत्याने त्यांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करीत आहेत.
राम कपूर यांचे आताचे व्हिडीओ आणि फोटो पाहिल्यावर कित्येकांना हे तेच आधीचे स्थूल राम कपूर आहेत का, असा प्रश्न पडत आहे. अशात वजन कमी केल्यानंतर सोशल मीडियावर अनेक चाहत्यांनी त्यांचं कौतुक केलं आहे. तर काहींनी त्यांच्या वजन कमी करण्यावर प्रश्नही उपस्थित केले आहेत. वजन कमी करण्यासाठी त्यांनी शस्त्रक्रिया केली असावी, असा दावा काही व्यक्ती करीत आहेत. वजन कमी केल्यानंतर त्यांच्याबद्दल सुरू असलेली ही चर्चा ऐकून आता राम कपूर यांनी स्वत: या गोष्टीचा खुलासा केला आहे.
त्यांनी इस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये त्यांनी शस्त्रक्रिया केल्याच्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. तसेच असे दावे करणाऱ्यांना त्यांनी चोख पद्धतीने उत्तर दिलं आहे. राम कपूर यांनी व्हिडीओमध्ये सांगितलं, “नमस्कार इन्स्टा फॅमिली, तुम्ही सर्व कसे आहात? माझ्या कानावर आलं की, काही व्यक्ती म्हणत आहेत की, मी वजन कमी करण्यासाठी एक शस्त्रक्रिया केली आहे. खरं तर शस्त्रक्रिया करण्यात काहीच वाईट नाही. पण, पुढच्या ३० सेकंदांत मी तुम्हाला मी काय केले ते सांगतो.”
पुढे राम कपूर त्यांचे हात आणि दंड दाखवत म्हणतात, “हे जे दिसतं आहे ते शस्त्रक्रिया करून आलेलं नाही. नक्कीच माझी बॉडी फार काही चांगली नाही. पण, हे दाखवण्याचं कारण हेच की, मी कोणतीही शस्त्रक्रिया केलेली नाही. अशा पद्धतीची बॉडी बनवण्यासाठी तासन् तास मेहनत घ्यावी लागते. त्यासाठी कोणताही शॉर्टकट नाही.”
“आता पुढच्या सहा ते सात महिन्यांमध्ये मी आणखी जास्त मेहनत घेणार आहे आणि सिक्स पॅक बनवणार आहे. जर एखाद्या व्यक्तीनं वजन कमी करण्यासाठी शस्त्रक्रिया केलीच, तर काय झालं? यात फार काही मोठी गोष्ट नाही”, असंही राम कपूर पुढे म्हणले. तसेच शेवटी त्यांनी या व्हिडीओला एक कॅप्शनही दिली. कॅप्शनमध्ये त्यांनी “आता तुमचा माझ्यावर विश्वास आहे का…?”, असं लिहिलं आहे.