२०२४ मधील सर्वात मोठे दोन चित्रपट एका दिवसांच्या फरकाने प्रदर्शित झाले आहेत. अजय देवगणचा ‘मैदान’ व अक्षय कुमार – टायगर श्रॉफचा ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. या दोन्ही चित्रपटाच्या टक्करची गेले काही दिवस चांगलीच चर्चा सुरू आहेत, अशातच या चित्रपटांच्या कमाईची आकडेवारी समोर आली आहे, ती जाणून घेऊया.
‘बडे मियाँ छोटे मियाँ’ बॉक्स ऑफिस कलेक्शन
अक्षय कुमार, टायगर श्रॉफ, अलाया एफ व मानुषी छिल्लर यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ ११ एप्रिल रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटाने पहिल्या दिवशी ग्रँड ओपनिंग केली आहे. गुरुवारी पहिल्या दिवशी ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ ने १५.५० कोटींच्या व्यवसाय केला आहे, यासंदर्भात इंडस्ट्री ट्रॅकर ‘सॅकनिल्क’ने आकडेवारी दिली आहे.
‘मैदान’ बॉक्स ऑफिस कलेक्शन
‘मैदान’ हा चित्रपट फूटबॉल कोच सय्यद अब्दुल रहीम यांची बायपिक आहे. अजय देवगणची मुख्य भूमिका असलेला ‘मैदान’ चित्रपट १० एप्रिल रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटाच्या दोन दिवसांच्या कमाईची आकडेवारी समोर आली आहे. इंडस्ट्री ट्रॅकर ‘सॅकनिल्क’ने दिलेल्या वृत्तानुसार, ‘मैदान’ने दोन दिवसांत एकूण ७.१४ कोटी रुपयांची कमाई केली आहे.
‘बडे मियाँ छोटे मियाँ’ ‘मैदान’वर पडला भारी
दोन्ही चित्रपटांचं बॉक्स ऑफिस कलेक्शन पाहता एका दिवसात ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ ने चांगली कमाई केल्याचं दिसतंय. त्या तुलनेत ‘मैदान’ची दोन दिवसांची कमाई कमी आहे. आज शुक्रवार आहे, त्यामुळे कदाचित दोन्ही चित्रपटांची कमाई कमी असेल, पण वीकेंडला यापैकी कोणता चित्रपट प्रेक्षकांना आकर्षित करण्यात यशस्वी होतो, ते पाहणं महत्त्वाचं ठरेल.
दोन्ही चित्रपटांचं बजेट
‘बडे मियाँ छोटे मियाँ’ चित्रपटाचं बजेट थोडंथोडकं नाही तर तब्बल ३५० कोटी आहे, तर त्या तुलनेत ‘मैदान’ चित्रपटाचं बजेट खूप कमी आहे. या बायोपिकच्या निर्मितीसाठी ९० कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. आता कोणता चित्रपट निर्मितीखर्च वसूल करतो, ते येत्या काळातच कळेल.