गायक व रॅपर बादशाहने जाहीर माफी मागितली आहे. त्याच्या ‘सनक’ गाण्यानंतर वाद झाला होता, त्यानंतर आता त्याने इन्स्टाग्रामवर स्टेटमेंट जारी करत माफी मागितली आहे. ‘सनक’ या गाण्यावरून वाढत चाललेला वाद पाहून आता या गायकाने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे.
बादशाहने आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, “माझ्या नुकत्याच रिलीज झालेल्या ‘सनक’ या गाण्याने काही लोकांच्या भावना दुखावल्याचे मला समजले आहे. मला कधीच कळत-नकळत कुणालाही दुखवायचे नाही. मी माझी कलात्मक निर्मिती आणि संगीत रचना तुमच्यासाठी, माझ्या चाहत्यांसाठी, खूप प्रामाणिकपणे आणि उत्साहाने घेऊन येत असतो. नुकत्याच घडलेल्या घटनेनंतर ठोस पावलं उचलत मी माझ्या गाण्यांचे काही भाग बदलले आहेत. सर्व डिजिटल प्लॅटफॉर्मवर जुने व्हर्जन नवीन व्हर्जनने बदलले जाईल, पण त्याला थोडा वेळ लागेल, तोपर्यंत सर्वांनी संयम ठेवा. मी अजाणतेपणाने कोणाच्याही भावना दुखावल्या असतील, तर माफी मागतो.”
“माझे चाहते नेहमीच माझा सर्वात मोठा आधार आहेत, म्हणूनच मी त्यांना नेहमीच महत्त्व देतो आणि त्यांच्यावर खूप प्रेम करतो. तुम्हा सर्वांना माझे खूप खूप प्रेम,” असं म्हणत बादशाहने चाहत्यांचे आभार मानले आहेत.
बादशाहच्या गाण्यावरून झालेला वाद नेमका काय?
गाण्यात रॅपरने महादेवाच्या नावाचा वापर केला आहे, ज्यावर महाकालेश्वर मंदिराच्या पुजाऱ्याने आक्षेप घेत बादशाहला फटकारलं. तसेच गाण्यात बदल न केल्यास त्याच्याविरुद्ध पोलिसांत तक्रार देण्याचा इशाराही पुजाऱ्याने दिला होता.