Badshah Birthday Special: आज भारतीय संगीत आणि खासकरून चित्रपट संगीतात झालेले बदल हे फारसे सुखावह नसले तरी आजच्या तरुण पिढीसाठी ते बदल आवश्यक आहेत. कारण आजची पिढी ही सैगलपासून रफीपर्यंत आणि सोनू निगमपासून सिद्धू मुसेवालापर्यंत सगळ्यांची गाणी ऐकते आणि त्यावर आपले मत तयार करते. त्यामुळे सरसकट आजच्या संगीतविश्वाला किंवा कलाकारांना नावं ठेवून चालणार नाही, कारण “Change is the only constant thing” या नियमाप्रमाणे या क्षेत्रातही काही बदल होणं अपेक्षित आहेत आणि त्यातीलच एक सर्वात मोठा बदल म्हणजे ‘रॅप कल्चर’. जुन्या गाण्यांच्या रिमेक व रीमिक्सपेक्षा ‘रॅप’ ही फार मोठी, कठीण आणि महत्त्वाची गोष्ट आहे हे समजून घेणंही फार महत्त्वाचं आहे. कारण ‘रॅप’मधून जगभरात जगात क्रांति घडू शकते, पण केवळ काही लोकांच्या भपकेबाजपणाखाली ‘रॅप’चं महत्त्व आणि उद्देश कायम दबला गेला. याच ‘रॅप कल्चर’ला व खासकरून ‘भारतीय हिप-हॉप म्युझिकला’ जागतिक स्तरावर दखल घ्यायला लावली ती म्हणजे आदित्य प्रतीक सिंह सिसोदियाने!
१९ नोव्हेंबर १९८५ साली एका हिंदू राजपूत घराण्यात दिल्लीमध्ये आदित्यचा जन्म झाला. दिल्लीच्या पितमपुरा भागातील बाल भारती शाळेत आदित्यचं शालेय शिक्षण पूर्ण झालं. शाळेतच आदित्यला संगीताबद्दल रुचि निर्माण झाली, परंतु यावर आपलं पोट भागणार नसल्याने आधी गणित या विषयातील आणि मग सिव्हिल इंजिनियरिंगमधील शिक्षण त्याने पूर्ण केलं. चंदीगडमध्येच इंजिनियरिंग करत असतानाच त्याची ओळख पंजाबी संगीत विश्वाशी झाली आणि इथूनच ‘रॅप’ लिहायचा एक चसकाच आदित्यला लागला. आयएएस अधिकारी व्हायचं स्वप्न उराशी बाळगणारा या आदित्य प्रतीक सिंह सिसोदियाचा सुप्रसिद्ध रॅपर ‘बादशाह’ बनण्यापर्यंतच्या या अद्भुत प्रवासाबद्दलच आपण आज जाणून घेणार आहोत.
आणखी वाचा : ‘उलगनायगन’ कमल हासन- अभिनयाच्या अथांग महासागरातील अढळ हिमनग
आपल्या गाण्यांमधून ‘बॅड बॉय’ ही प्रतिमा निर्माण करणारा बादशाह हा खासगी आयुष्यात फारच साधा आणि सरळ आहे. इंडस्ट्रीमध्ये बादशाहने सर्वप्रथम ‘कुल इक्वल’ या नावाने आपल्या करिअरची सुरुवात केली, परंतु शाहरुख खानच्या ‘बादशाह’ चित्रपटाचा आणि त्यातील शाहरुखच्या चार्मचा त्याच्यावर प्रभाव पडला अन् मग त्यानेही आपलं नाव ‘बादशाह’ म्हणून ठेवायचं ठरवलं. २००६ मध्ये त्याने ‘माफिया मुंडिर’ या पंजाबी ग्रुपमध्ये यो यो हनी सिंगसह सहभाग घेतला. या ग्रुपमध्ये त्यांच्याबरोबर इतरही बरेच रॅपर्स सहभागी झाले, परंतु नंतर आपापसांतच काही वाद निर्माण झाल्याने हळूहळू यातून एकएक कलाकार बाहेर पडला आणि त्यांनी आपापल्या मार्गावर चालायचा निर्णय घेतला. त्यांनंतर बादशाहनेदेखील स्वतःचा मार्ग निवडला आणि या इंडस्ट्रीमध्ये त्याने स्वतःचं वेगळं स्थान निर्माण करायचं ठरवलं.
बादशाहचा पहिला सोलो अल्बम ‘वन’ (आरिजिनल नेवर एण्ड्स)मध्ये त्याच्या खासगी आयुष्याशी बरेच संदर्भ तुम्हाला सापडतील. एका मुलाखतीमध्ये खुद्द बादशाहनेही ही गोष्ट कबूल केली की तो अल्बम त्याच्या जीवनावरच बेतलेला होता. अशाच वेगवेगळ्या अल्बम, सिंगल्स आणि म्युझिक कंपन्यांच्या लेबलमधून बादशाह त्याचे रॅप लोकांपर्यंत पोहोचवत होता. २०१४ मध्ये ‘हंम्टी शर्मा की दुल्हनिया’ या चित्रपटात २०१२ साली बादशाहने रेकॉर्ड केलेलं ‘सॅटर्डे सॅटर्डे’ हे गाणं पुन्हा वापरण्यात आलं आणि बादशाहची बॉलिवूडमध्ये एन्ट्री झाली. यानंतर मात्र त्याने मागे वळून पाहिलं नाही. आजही दरवर्षी प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटांपैकी किमान ३ चित्रपटांत तरी बादशाहचं गाणं अन् रॅप तुम्हाला ऐकायला मिळतोच.
‘कपूर अँड सन्स’मधील ‘कर गयी चूल’, ‘खूबसूरत’मधील ‘अभी तो पार्टी शूरु हुई है’ या दोन गाण्यांमधून बादशाहला अधिक प्रसिद्धी मिळाली. नंतर खुद्द रेहमान यांनी संगीतबद्ध केलेल्या ‘हम्मा हम्मा’ या गाण्याच्या रिमेकमध्येसुद्धा बादशाहचा रॅप आपल्याला ऐकायला मिळाला. आधी केवळ काही छोट्या मोठ्या चित्रपटासाठी काम करणारा बादशाह आता धर्मा प्रोडक्शन आणि यश राज फिल्म्ससारख्या बॉलिवूडमधील बड्या स्टुडिओजसह काम करू लागला. याचदरम्यान यूट्यूबच्या माध्यमातूनही बादशाहने कित्येक सुपरहीट गाणी दिली. सोशल मीडियावर रील्सच्या माध्यमातून नेटकऱ्यांना वेड लावणाऱ्या ‘जुगनू’ या गाण्याने तर विदेशी लोकांनासुद्धा भुरळ घातली. बॉलिवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसबरोबरच्या ‘गेंदा फूल’ व आस्था गीलबरोबरच्या ‘डिजेवाले बाबू’ या बादशाहच्या गाण्यांनी तर युट्यूबच्या विश्वात एक वेगळाच इतिहास रचला.
युट्यूबवर मिलियनमध्ये व्यूज आणि करोडो लोकांचे प्रेम मिळवणाऱ्या बादशाहवर ‘पागल’ या गाण्यासाठी ७२ लाख रुपयांचे व्यूज खरेदी करण्याचे आरोप लागले, आपला एक रेकॉर्ड बनवण्यासाठी बादशाहने हे केल्याचं बऱ्याच लोकांनी सांगितलं परंतु त्यातून काहीच निष्पन्न झालं नाही. आपल्या ‘सनक’ या गाण्यात एका अश्लील शब्दाला जोडून बादशाहने प्रभू शंकराचं नाव घेतलं आणि लोकांनी त्याला चांगलंच धारेवर धरलं. यासाठी त्याला माफीही मागावी लागली अन् गाण्यातील तो शब्द बदलावाही लागला होता. याबरोबरच बादशाहचं वैवाहिक जीवनही बऱ्याच गोष्टींमुळे चर्चेत होतं, २०२० मध्ये त्याने आपली पत्नी जॅस्मिनपासून घटस्फोट घेतला. बादशाह हा जितका उत्कृष्ट रॅपर आहे तितकाच हुशार उद्योजकही आहे. आजवर त्याने वेगवेगळ्या व्यवसायात पैसे गुंतवले आहेत, शिवाय त्यात आलेलं अपयश पचवून पुन्हा शून्यापासून त्याने सुरुवातही केली आहे. ‘खानदानी शफाखाना’सारख्या चित्रपटातून बादशाहने अभिनयातही नशीब आजमावलं आहे. याबरोबरच स्वतःचं एक टेलिव्हिजन चॅनल सुरू करून त्यातही बरंच नुकसान बादशाहने सोसलं आहे. काही पंजाबी चित्रपटांची निर्मितीही बादशाहने केली आहे ज्यातून त्याला बरंच काही शिकायला मिळालं आहे.
सलग तीन वर्षं म्हणजेच २०१७, २०१८ व २०१९ यावर्षी फोर्बस इंडियाच्या १०० सेलिब्रिटीजच्या यादीत सर्वाधिक मानधन घेणाऱ्या सेलिब्रिटीजमध्ये एकमेव रॅपर म्हणजेच बादशाहचं नाव होतं. आज ‘रॅप कल्चर’हे ‘गली बॉय’सारख्या चित्रपटामुळे लोकांसमोर आलं असलं तरी ९० च्या दशकातच बाबा सेहगलनेच भारतीयांना ‘रॅप कल्चर’ची ओळख करून दिली होती. त्यानंतर बोहेमिया, रफ्तार, डिव्हाईन, यो यो हनी सिंह, नेझी, सिद्धू मुसेवाला अशा कित्येक मंडळींनी या ‘रॅप कल्चर’ला देशभरात पोहोचवलं. परंतु या संगीत प्रकाराचा अत्यंत हुषारीने वापर करून आंतरराष्ट्रीय स्तरावर परदेशी लोकांना भारतीय हिप-हॉपची दखल घ्यायला लावली ती ‘बादशाह’ने.
बादशाह हा त्याच्या जबरदस्त फॅशनसाठी, त्याच्या ऊंची महागड्या कपड्यांच्या ब्रॅंडसाठी, त्यांच्या आलीशान जीवनशैलीसाठी, करोडो रुपयांच्या ५०० जोडी शूजसाठी ओळखला जात असला तरी आज इथवर पोहोचण्यासाठी त्याने तितकीच प्रचंड मेहनतही केली आहे. आज बरेच लोक बादशाहने रॅप कल्चरमध्ये अश्लीलता आणली अशाप्रकारचे आरोप लावतात, परंतु याच बादशाहमुळे भारतीय हिप-हॉपला मिळालेलं ग्लॅमर हे लोक सोयीस्कररित्या विसतात. आजच्या काळात सोनू निगम व अरिजित सिंहसारखे गायक जेवढे आवश्यक आहेत तेवढेच बादशाहसारखे रॅपर्ससुद्धा आवश्यक आहेत. रॅप म्हणजे केवळ यमक जुळवून काहीतरी गाऊन दाखवणं नाही तर त्यामागे खूप मोठा इतिहास आहे ज्याची पाळंमुळं तुम्हाला साऱ्या जगभरात पसरलेली पाहायला मिळतील. हा इतिहास जाणून घेणं फार महत्त्वाचं आहे. अन् आज याच संगीत प्रकाराला भारतीय वेष्टनात गुंडाळून ग्लॅमरचा जबरदस्त तडका देत साऱ्या बॉलिवूडपासून विदेशी सेलिब्रिटीजना आपल्या रॅपवर थीरकायला भाग पाडणाऱ्या बादशाहला वाढदिवसाच्या शुभेच्छा.