सुदीप्तो सेन दिग्दर्शित ‘द केरला स्टोरी’ हा चित्रपट रिलीज होण्यापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात अडकला. चित्रपट प्रदर्शित होताच काही लोकांनी त्यावर टीका करायला सुरुवात केली. राजकीय संघटनांकडून या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्याची मागणी होत होती. चित्रपटाची कथा धर्मांतर केलेल्या चार महिलांची आहे, ज्यांना दहशतवादी संघटना ISIS मध्ये सामील केले जाते.
एकीकडे या चित्रपटाला प्रचंड विरोध होत आहे तर दुसरीकडे प्रेक्षकांनी हा चित्रपट डोक्यावर घेतला आहे. कोणताही स्टार नसलेला हा चित्रपट लवकरच २०० कोटींचा टप्पा पार करणार अशी आशा आहे. समाजाच्या वेगवेगळ्या स्तरांतून यावर प्रतिक्रिया देण्यात येत आहेत. राजकारणी, सेलिब्रिटीज यांनी या चित्रपटावर मत मांडलं आहे.
‘फ्री प्रेस जर्नल’च्या वृत्तानुसार नुकतंच बागेश्वर धामचे पंडित धीरेंद्र शास्त्री यांनीदेखील या चित्रपटावर भाष्य केलं आहे. या चित्रपटात सत्य परिस्थिती मांडण्यात आली आहे आणि असे आणखी चित्रपट यायला हवेत असंही त्यांनी म्हटलं आहे. याविषयी धीरेंद्र शास्त्री म्हणाले, “या चित्रपटातून देशातील वास्तव दाखवण्यात आलं आहे. काही लोक या चित्रपटाच्या विरोधात आहेत. मी इतक्या दिवसांपासून जे सांगतोय तेच या चित्रपटाच्या माध्यमातून सांगण्यात आलं आहे. आपल्या लोकांना जागरूक करण्यासाठी अशा धाटणीचे आणखी चित्रपट यायला हवेत.”
आणखी वाचा : ६० वर्षीय शाहरुख खानच्या चाहतीने व्यक्त केली शेवटची इच्छा; म्हणाली “मृत्यूआधी मला… “
‘द केरला स्टोरी’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घातला आहे. प्रेक्षकांनीही हा चित्रपट डोक्यावर घेतला आहे. या चित्रपटात ३२००० मुलींच्या संख्येवरूनही बराच गदारोळ झाला होता. नुकतंच विपुल अमृतलाल शाह यांनी स्पष्टीकरण देत लवकरच याबद्दल खात्रीशीर माहिती समोर आणण्याचा दावादेखील केला आहे.