संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘बाजीराव मस्तानी’ या चित्रपटाला आज आठ वर्षे पूर्ण झाली आहेत. १८ डिसेंबर २०१५ रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. चित्रपटाच्या निमित्ताने आपल्या इतिहासाचा अविभाज्य घटक असणारे थोरले बाजीराव यांची कारकीर्द मोठ्या पडद्यावर पाहायला मिळाली होती. बाजीरावांची भूमिका साकारणारे रणवीर सिंग यांच्यासह प्रियांका चोप्रा आणि दीपिका पदुकोण यांच्या कामाचीही चर्चा झाली होती. ‘पिंगा’ हे गाणं व्हायरलही झालं होतं. हा चित्रपट काहींना आवडला तर काहींनी जोरदार टीकाही केली होती. या चित्रपटासंदर्भात खुद्द पेशव्यांच्या वंशजांना काय वाटतं हे आम्ही जाणून घेतलं. काही दिवसांपूर्वी लोकसत्ता ऑनलाइनच्या ‘गोष्ट पुण्याची’ या मालिकेतील १०० व्या भागात दहावे वंशज पुष्करसिंह पेशवा यांची मुलाखत घेण्यात आली होती. या मुलाखतीत त्यांनी या चित्रपटाबद्दल त्यांचं मत मांडलं होतं. तसेच काही प्रश्नांची उत्तरंही दिली होती.
थोरल्या बाजीरावांच्या आयुष्यावर आधारित चित्रपटांची निर्मिती झाली पण बहुतांश कलाकृतींमध्ये मस्तानी यांचाच संदर्भ होता. यामुळे बाजीरावांची देदिप्यमान कारकीर्द झाकोळली जाते का? यावर पुष्करसिंह पेशवा म्हणाले, “बाजीरावांची कारकीर्द एवढी मोठी आहे की त्यांनी लढलेल्या ४० लढाया असतील, ३० असतील किंवा २२ असतील…प्रत्येक इतिहासकारांचं त्याबद्दल वेगळं मत आहे. पण ज्या लढाया ते लढलेत त्यात ते अजिंक्य राहिलेत. त्यांच्यासाठी अजिंक्य योद्धा हे नाव अगदी योग्य आहे. मला वाटतं की एखाद्या व्यक्तीवरती तुम्ही एखादा चित्रपट बनवत असाल किंवा एखादी सीरियल बनवत असाल आणि ती व्यक्ती बाजीरावांसारखी असेल तर तुमच्याकडे त्या व्यक्तीबद्दल इतकी माहिती आहे की तुमच्यासाठी सुवर्णसंधी असते. पण त्या सिनेमात ती संधी वाया घालवली गेली असं माझं मत आहे.”
पुढे पुष्करसिंह पेशवा म्हणाले, “माझं दुसरं मत असं आहे की मस्तानी बेगम असतील किंवा त्यांच्या पत्नी काशीबाई असतील, त्या दोघीही पत्नी होत्या. त्या बाजीरावांच्या आयुष्यात पुष्कळ नंतर आल्या. त्यांच्याबद्दलचं कदाचित थोडं ग्लोरिफिकेशन इतिहासात असेल असं मला वाटतं. जर तुम्ही एखादा विषयच ‘बाजीराव मस्तानी’ नावाचा निवडला तर तुम्हाला चित्रपट तसाच तयार व्हायला हवा आहे हेही तितकंच खरं आहे. पण जेव्हा तुम्ही बाजीरावांवर एवढा मोठा चित्रपट तयार करत आहात तर मग तो तुम्ही ‘बाजीराव मस्तानी’ म्हणून तयार करायला हवा होता की ‘बाजीराव’ म्हणून तयार करायला हवा होता, हा एक मोठा प्रश्न आहे. कारण तुम्हाला माहीत आहे की तो चित्रपट तयार करायला तुमच्याकडे पैसे आहेत आणि तो चित्रपट जर बाहेरच्या देशातील लोकही बघणार आहेत, तर तो सिनेमा बाजीरावांवर तयार करायला हवा होता असं मला वाटतं.”
‘बाजीराव मस्तानी’ भयंकर चित्रपट
“‘बाजीराव मस्तानी’ या चित्रपटाबद्दल बोलायचं झाल्यास अतिशय भयंकर सिनेमा तयार केला गेला होता, असं आम्हा सगळ्यांना वाटतं. ना त्याची स्क्रिप्ट बरोबर होती, ना त्यात दाखवलेल्या गोष्टी बरोबर होत्या. एक उदाहरण द्यायचं झालं तर चिमाजी अप्पांसारखा माणूस जो पेशव्यांच्या घरात वाढलाय, तो मस्तानीला बेड्यांमध्ये कधीच ठेवणार नाही. ही त्या काळातली अगदी सरळ गोष्ट आहे. ३०० वर्षांपूर्वीची गोष्ट आपण बोलतोय. त्यामुळे या गोष्टी ज्या चित्रपटात दाखविण्यात आल्या आहेत, त्या दाखवायला नको होतं असं एकंदरीत मला वाटतं,” असं मत पुष्करसिंह पेशवा यांनी मांडलं.
पेशवाईवर एखादी मालिका किंवा सीरिज तयार व्हावी असं वाटतं का?
पेशवाईवर आधारित एखादी मालिका किंवा सीरिज तयार व्हावी, असं तुम्हाला वाटतं का? असा प्रश्न विचारल्यावर पुष्करसिंह पेशवा म्हणाले, “पेशवाईवर मालिका नक्कीच होऊ शकते. एखाद्या जबाबदार दिग्दर्शकाने जर ती केली तर त्याचा आनंद वाटू शकतो. जो खरंच इतिहास धरून ती मालिका बनवेल. मला असं वाटतं की अंगद म्हैसकर ज्याने बाजीरावांची भूमिका केली होती ती अतिशय सुरेख मालिका होती. तसेच ‘स्वामी’ ही अतिशय सुरेश मालिका होती. अशा मालिका बनायला काहीच हरकत नाही. त्याबरोबर कधी कधी असंही वाटतं की अशा मालिका बनल्या आणि टीआरपी नसल्याने बंद झाल्या तर त्याचा काय उपयोग,” असं त्यांनी नमूद केलं होतं.