प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभ मेळ्यात फक्त भारतातीलच नव्हे तर जगभरातील लोक येत आहेत. अनेक बॉलीवूड सेलिब्रिटीही त्रिवेणी संगम येथे पवित्र स्नान करण्यासाठी जात आहेत. बॉलीवूडमधील सुप्रसिद्ध दिग्दर्शक कबीर खानही महाकुंभ मेळ्यात सहभागी झाला. त्याने त्रिवेणी संगम येथे पवित्र स्नान केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कबीर खानने महाकुंभ मेळ्यात सहभागी होण्याचा उत्साह व्यक्त केला. कुंभ मेळ्यामुळे एकता वाढली, असं खानने नमूद केलं. “मी खूप उत्सुक आहे. कुंभमेळा १२ वर्षांनी एकदा होतो. मी इथे आलोय, त्यासाठी मी स्वतःला नशीबवान समजतो. मी इथेही पवित्र स्नान करणार. या गोष्टी हिंदू-मुस्लिमांबाबत नाहीत. हे आपलं मूळ आहे. या आपल्या देशाच्या आणि आपल्या सभ्यतेच्या गोष्टी आहेत. यामध्ये हिंदू किंवा मुस्लीम नाही, जर तुम्ही स्वतःला भारतीय समजत असाल, तर तुम्ही सर्व अनुभव घेतले पाहिजे,” असं ‘बजरंगी भाईजान’चा दिग्दर्शक कबीर खान एएनआयशी बोलताना म्हणाला.

पाहा व्हिडीओ-

बुधवारी खासदार हेमा मालिनी यांनीही त्रिवेणी संगममध्ये पवित्र स्नान केले. हेमा यांच्याबरोबर जुना आखाड्याचे स्वामी अवधेशानंद गिरी महाराज आणि योगगुरू बाबा रामदेवही सामील झाले होते. “मी नशीबवान आहे की मला गुरू स्वामी अवधेशानंदजींबरोबर या शुभ प्रसंगी पवित्र स्नान करण्याची संधी मिळाली. कोट्यवधी लोक इथे येत आहेत, त्यामुळे स्नान करण्यासाठी जागा मिळाल्याने मला खूप चांगलं वाटलं,” असं हेमा मालिनी म्हणाल्या.

आत्तापर्यंत सिनेविश्वातील अनेक सेलिब्रिटींनी महाकुंभात स्नान केले आहे. या यादीत अनुपम खेर, मिलिंद सोमण, कोरिओग्राफर रेमो डिसूझा आणि कॉमेडियन सुनील ग्रोव्हर यांचाही समावेश आहे. तसेच कोल्डप्लेचा गायक ख्रिस मार्टिन आणि त्याची गर्लफ्रेंड अभिनेत्री डकोटा जॉन्सन हे देखील महाकुंभ मेळ्यात सहभागी होण्यासाठी प्रयागराजमध्ये आले होते. त्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता, ज्यात ते दोघेही पारंपरिक पोशाखात प्रयागराजमध्ये फिरताना दिसले होते.

महाकुंभ मेळ्याची सुरुवात १३ जानेवारीपासून झाली. हा मेळा २६ फेब्रुवारीपर्यंत सुरू राहील. याठिकाणी बुधवारी पहाटे चेंगराचेंगरी झाली आणि मेळ्याला गालबोट लागलं. या घटनेत अनेक भाविकांना जीव गमवावे लागले. या मृतांच्या कुटुंबियांना मदतीची घोषणा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केली. तर पंतप्रधान मोदींनी या घटनेबद्दल शोक व्यक्त केला.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bajrangi bhaijaan director kabir khan visits mahakumbh 2025 says its not about hindus and muslims hrc