बॉलीवूडमध्ये अनेक सेलिब्रिटींनी आंतरधर्मीय लग्न केले आहे. या फोटोत दिसत असलेल्या जोडप्याच्या आंतरधर्मीय लग्नाला २५ वर्षांहून जास्त काळ उलटला आहे. हे लोक आनंदाने संसार करत आहेत. या दोघांची पहिली भेट एका टीव्ही शोदरम्यान झाली होती, नंतर ते प्रेमात पडले आणि त्यांनी लग्न केलं.
लग्नाला २७ वर्षे झाली असली तरी या हिंदू अभिनेत्रीने कधीच मुस्लीम पतीचं आडनाव लावलं नाही. त्यामागचं कारण काय, तेही तिने सांगितलं होतं. हे जोडपं म्हणजे ‘बजरंगी भाईजान’चा दिग्दर्शक कबीर खान व त्याची पत्नी मिनी माथूर होय.
नेहा धुपियाच्या शो ‘नो फिल्टर नेहा’ सीझन ५ मध्ये कबीर खानने त्याची व मिनी माथूरची सुंदर प्रेमकहाणी सांगितली होती. “मिनी आणि मी खरं तर एकत्र काम न करण्याचा निर्णय घेतला, कारण आम्ही दोघेही एकाच क्षेत्रातले आहोत. आम्ही आमचे पर्सनल आणि प्रोफेशन आयुष्य वेगळे ठेवले आहे. पण आमची भेट एका शूटमध्ये झाली होती, त्यामुळे आम्ही एकत्र शूटिंग केले आहे. होम टीव्ही नावाचे एक चॅनल होते आणि ते त्यावेळी ते एक मोठा शो करत होते. त्या शोचं पहिलं बक्षीस मुंबईत एक फ्लॅट होता आणि त्यावेळी आमची भेट झाली होती,” असं कबीर खान म्हणाला होता.
कबीर खान-मिनी माथुरची पहिली भेट
“मी एक फ्रीलान्स कॅमेरा पर्सन होतो आणि मिनी अँकर होती आणि सर्वात रंजक गोष्ट म्हणजे आम्ही दोघेही प्रॉडक्शन हाऊसच्या ऑफिसमध्ये गेलो होतो, कारण आम्हा दोघांकडे तारखांची अडचण होती, म्हणून आम्ही शो करू शकणार नाही. आम्हाला एकमेकांच्या तारखांच्या अडचणीबद्दल माहीत नव्हतं. आम्ही त्या ऑफिसमध्ये पहिल्यांदा भेटलो, त्या भेटीत आमच्या तारखांच्या अडचणी सोडवल्या आणि ठरवलं की आम्हाला हा शो करायचा आहे,” असं कबीर खानने सांगितलं होतं.
इंजिनिअर मुलगा जावई म्हणून हवा होता, पण…
या शोसाठी कबीर व मिनी संपूर्ण भारतभर फिरले आणि त्या प्रवासादरम्यान त्यांनी आम्ही एकमेकांना जाणून घेतलं. आणि अशीच त्यांच्या नात्याची सुरुवात झाली. मिनी माथूरने तिच्या मुलाखतीत अनेकदा सांगितलं आहे की तिचे वडील खूप कडक शिस्तीचे होते. ते आपल्या धर्माचा आणि समाजाचा खूप जास्त विचार करायचे. त्यामुळे फक्त एक हुशार इंजिनिअर मुलगा माथुर कुटुंबाचा जावई व्हावा अशी त्याची इच्छा होती, पण मिनीच्या नशीबात मात्र काहीतरी वेगळंच होतं.

आपल्या वडिलांचा कडक स्वभाव मिनीला चांगलाच ठाऊक होता. त्यामुळेच मिनीने मित्र म्हणून कबीरची तिच्या वडिलांशी ओळख करून दिली होती आणि एवढंच नाही तर मिनीने कबीरचे आडनावही वर्षभर लपवून ठेवले होते. कबीर खानने हळूहळू मिनीच्या वडिलांचं मन जिंकलं आणि एक दिवस मिनीच्या वडिलांनी कबीरशी तिच्या लग्नाचा विषय काढला. तेव्हा बोलता बोलता मिनीने त्याचं आडनाव खान असल्याचं सांगितलं. दोघांचं लग्न नोंदणी पद्धतीने व पारंपरिक पद्धतीने झालं होतं. मिनी माथुर व कबीर खान यांच्या लग्नाला आता २७ वर्षे झाली आहेत.
मिनी माथुरने लग्नानंतर आडनाव बदललं नाही, तिने तिच्या नावापुढे खान कधीच लावले नाही. तिने आडनाव न बदलण्यामागचं कारण एका मुलाखतीत सांगितलं होतं. “कबीरला वाटले की जर मी ‘खान’ आडनाव लावलं, तर मला माझी सर्व अधिकृत कागदपत्रे बदलावी लागतील आणि त्याला त्या प्रक्रियेतून जायचं नाही. तसेच मला ‘मिनी माथुर’ म्हणून ओळख मिळाली आहे, मग मी ती ओळख का पुसू?” असं मिनी म्हणाली होती.