Barack Obama’s Favorite Movies of 2024 : अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा सोशल मीडियावर खूप सक्रिय आहेत. २०२४ हे वर्ष संपताना त्यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटर एक पोस्ट केली आहे. ही पोस्ट त्यांच्या आवडत्या चित्रपटांबद्दल आहे. त्यांना या वर्षात आवडलेल्या चित्रपटांची यादी त्यांनी शेअर केली आहे.
बराक ओबामा यांच्या आवडत्या चित्रपटांच्या यादीत पहिला चित्रपट भारतीय आहे. ज्या चित्रपटाची जगभर चर्चा होत आहे, तोच चित्रपट बराक ओबामा यांनाही आवडला आहे. त्यांनी या वर्षी रिलीज झालेल्या १० चित्रपटांची यादी शेअर केली आहे. “यावर्षी रिलीज झालेले हे काही चित्रपट आहेत जे लोकांनी पाहावे, असं मी सुचवतो”, असं कॅप्शन देऊन बराक ओबामा यांनी यादी शेअर केली आहे. या यादीत भारतीय चित्रपट ‘ऑल वी इमॅजिन अॅज लाईट’ पहिल्या क्रमांकावर आहे.
बराक ओबामांचे २०२४ मधील आवडते चित्रपट
१) ऑल वी इमॅजिन अॅज लाईट
२) कॉनक्लेव्ह
३) द पियानो लेसन
४) द प्रॉमिस्ड लँड
५) द सीड ऑफ द सॅक्रेड फिग
६) ड्यून: पार्ट टू
७) अनोरा
८) Dìdi
९) शुगरकेन
१०) अ कम्प्लिट अननोन
ऑल वी इमॅजिन अॅज लाईट चित्रपटाची जगभरात चर्चा आहे. या चित्रपटाला प्रतिष्ठित अशा ‘कान’ (Cannes) फिल्म फेस्टिव्हलमध्ये ‘ग्रँड प्रिक्स’ हा पुरस्कार मिळाला होता. तसेच या चित्रपटाला न्यूयॉर्कमध्ये झालेल्या गॉथम फिल्म अवॉर्ड्स २०२४ मध्येही सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपटाचा (फिचर ट्रॉफी) सन्मान मिळाला होता. या चित्रपटाला क्रिटिक्स चॉइस अवॉर्ड्समध्ये नॉमिनेशन मिळालं आहे. हा चित्रपट मामि महोत्सवातही शुभारंभाचा चित्रपट म्हणून दाखवण्यात आला होता. हा चित्रपट अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा यांनादेखील आवडला आहे. त्यांनी लोकांना हा चित्रपट पाहण्याची शिफारस केली आहे.
पायल कपाडिया दिग्दर्शित ‘ऑल वी इमॅजिन अॅज लाईट’मध्ये कानू कुसरुती, दिव्या प्रभा आणि छाया कदम यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट २२ नोव्हेंबरला मुंबई, दिल्ली, चेन्नई, बंगळूरु, हैदराबाद, पुणे, कोची, थिरुवनंतपुरम आणि कोलकातासारख्या शहरांमध्ये प्रदर्शित झाला होता. राणा दग्गुबाती याच्या ‘स्पिरिट मीडिया’ या कंपनीच्या वतीने ‘ऑल वुई इमॅजिन ॲज लाइट’ हा चित्रपट देशात आणि परदेशातही वितरित केला होता.