शाहरुख खान ‘डॉन’ सीरिजमधून बाहेर पडल्याने बरेच चाहते निराश झाले. नुकतंच काही दिवसांपूर्वी फरहान अख्तरने रणवीर सिंहची आगामी ‘डॉन’ म्हणून घोषणा केली. ‘डॉन ३’चा टीझरसुद्धा नुकताच प्रदर्शित झाला अन् त्यातील रणवीर सिंहचा लुक पाहून चाहत्यांनी टीकाही केली. शाहरुख खान या सीरिजमधून बाहेर पडण्याआधी ‘डॉन ३’मध्ये शाहरुखसह अमिताभ बच्चनही दिसणार अशी चर्चा रंगली होती.
अमिताभ बच्चन यांच्या कारकीर्दीतील ‘डॉन’ हा अत्यंत महत्त्वाचा चित्रपट. आजही चित्रपटरसिक ‘डॉन’ म्हंटलं की बिग बी यांचंच नाव घेतात. ७० च्या दशकात या चित्रपटाने बिग बी यांना एक वेगळी ओळख मिळवून दिली, पण तुम्हाला ठाऊक आहे का की ‘डॉन’ या पात्रासाठी अमिताभ बच्चन हे निर्मात्यांची पहिली पसंती नव्हते. चित्रपटाचे दिग्दर्शक चंद्रा बारोट यांनी एका जुन्या मुलाखतीमध्ये याचा उलगडा केला होता.
अमिताभ बच्चन यांच्याआधी हा चित्रपट तेव्हाचे सुपरस्टार देव आनंद यांना ऑफर करण्यात आला होता, पण त्यांनी यासाठी नकार दिला. यानंतर चंद्रा बारोट हा चित्रपट घेऊन जितेंद्र आणि मग धर्मेंद्र यांच्याकडेही गेले, पण त्यांनीही यासाठी नकार दिल्यावर अखेर अमिताभ बच्चन यांच्या पदरी ‘डॉन’ ही पात्र पडलं अन् पुढे या चित्रपटाने अशी कामगिरी केली की २०२३ मध्येही या पात्राची भुरळ कलाकारांना पडते आहे.
दिग्दर्शक चंद्रा बारोट यांना त्यांच्या जवळच्या मित्राचे कर्ज फेडण्यासाठी पैसे हवे होते अन् यासाठीच त्यांनी हा चित्रपट करण्याचा घाट घातल्याचा त्यांनी खुलासा केला होता. इतकंच नव्हे तर या चित्रपटाचं नावदेखील ठरलेलं नव्हतं. त्यावेळी इंडस्ट्रीमध्ये या चित्रपटाला ‘डॉन वाली स्क्रिप्ट’ असं म्हंटलं जात असे. सध्या ‘डॉन ३’ अन् त्यात झळकणाऱ्या रणवीरची सर्वत्र चर्चा आहे. फर्स्ट लुक पाहून लोकांनी यावर टीका जारी केली असली तरी नेमका चित्रपट प्रेक्षकांवर कितपत प्रभाव टाकेल ते येणारा काळच ठरवेल.