अभिनेता कमल सदानाने ३२ वर्षांआधी १९९२ मध्ये काजोलबरोबर ‘बेखुदी’ चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण केलं होतं. काजोलचाही हा पहिला चित्रपट होता. कमलच्या आयुष्यात एक अशी घटना घडली होती, ज्यामुळे तो उद्ध्वस्त झाला. कमलने २० व्या वर्षी त्याचं कुटुंब गमावलं होतं. त्याच्या वडिलांनी त्याच्यासमोर त्याची बहीण व आईचा खून केला होता. इतकंच नाही तर त्यांनी कमलवरही गोळी झाडली होती, पण तो बचावला. मग त्याचे वडील ब्रिज सदाना यांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली होती.
कमल सदानाने सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या मुलाखतीत त्याच्या आयुष्यातील हा दुर्दैवी प्रसंग सांगितला. “माझा २० वा वाढदिवस होता. त्या रात्री माझ्या डोळ्यासमोर माझे वडील ब्रिज सदाना यांनी माझी आई, बहीण आणि मला गोळ्या घातल्या. नंतर त्यांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. ही घटना घडली तेव्हा त्यांचे मित्र हरी आमच्याबरोबर होते आणि त्यांनाही हातात गोळी लागली होती. वडिलांनी आई व बहिणीवर गोळ्या झाडल्यानंतर मी पळत जाऊन शेजाऱ्यांना बोलावलं आणि त्यांना रुग्णालयात नेलं पण त्या दोघीही वाचू शकल्या नाहीत. दवाखान्यात जाईस्तोवर मलाही गोळी लागली याची मला कल्पना नव्हती. मला डॉक्टरांनी विचारलं की इतकं रक्त कुठून आलं तर मी म्हटलं की आई किंवा बहिणीचं असेल, मग डॉक्टरांनी सांगितलं की मलाही गोळी लागलीय. त्या रुग्णालयात जागा नसल्याने त्यांनी मला दुसरीकडे पाठवलं,” असं कमल म्हणाला.
दिव्या भारतीने निधनाआधी दारू प्यायली होती, अभिनेता कमल सदानाचे विधान; म्हणाला, “आम्ही एकत्र शूटिंग…”
मी जगायचं ठरवलं – कमल
“माझ्या मानेच्या आरपार गोळी गेली होती. माझ्या आई व बहिणीचा मृत्यू झाला, बाबांनीही स्वतःला संपवलं. माझं कुटुंब माझ्या डोळ्यासमोर एका क्षणात संपलं. मलाही गोळी लागली होती. गोळी मानेच्या एका बाजूने घुसली आणि दुसऱ्या बाजूने बाहेर निघाली, पण मी वाचलो. मी कसा वाचलो यामागे तार्किक कारण नाही. मला वाटतं ती गोळी नसांमधून गेली नाही त्यामुळे बचावलो. मी या घटनेतून सावरत जगायचं ठरवलं,” असं कमल म्हणाला.
‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ चित्रपट प्रदर्शित होऊन २० दिवस पूर्ण, एकूण कलेक्शन किती? जाणून घ्या
शुद्धीवर आलो तेव्हा समोर मृतदेह होते – कमल
वडिलांनी दारूच्या नशेत गोळ्या झाडल्या होत्या, असं कमलने सांगितलं. “त्या दिवशी माझा वाढदिवस होता आणि ही वाईट घटना घडली, पण त्याचा अर्थ असा नाही की माझे बालपण किंवा कुटुंब वाईट होते. माझे वडील वाईट नव्हते, मी दुसऱ्या रुग्णालयात होतो तेव्हा माझ्या डोक्यात सारखे विचार येत होते की माझे वडील काय करत असतील. मी शुद्धीवर आलो आणि मला घरी नेलं तेव्हा घरात तिघांचेही मृतदेह होते,” असं कमल तो प्रसंग आठवत म्हणाला.
मी वाढदिवस साजरा केला नाही – कमल
“या घटनेनंतर बरीच वर्षे मी माझा वाढदिवस साजरा केला नाही. खूप वर्षांनी मी एकदा पार्टी दिली होती. माझे मित्र घरी येतात आणि ते मला चिअर करतात पण ही घटना माझ्या मनातून जातच नाही. वाढदिवस आला की मला तीच घटना आठवते. मी आजही त्याच घरात राहतो जिथे ही घटना घडली होती. मी एकटा नाही. जगात असे अनेक लोक आहेत ज्यांनी त्यांच्या आयुष्यात माझ्यापेक्षा वाईट घटना पाहिल्या असतील,” असं कमल सदाना म्हणाला.
कमल सदानाचं करिअर
कमल सदानाच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास तो २०२२ मध्ये तो ‘सलाम वेंकी’ चित्रपटात दिसला होता. त्याने आजवर अनेक हिट आणि फ्लॉप चित्रपटांमध्येही काम केले आहे. त्याने टीव्ही मालिकाही केल्या. इतकंच नाही तर त्याने चित्रपटांचे दिग्दर्शन आणि निर्मितीही केली पण हिरो म्हणून त्याचं करिअर खूप लहान राहिलं.