बंगाली सुपरस्टार प्रोसेनजीत चॅटर्जीने हिंदी चित्रपट व सीरिजमध्येही काम केलंय. तो लवकरच अॅमेझॉन प्राइम पीरियड ड्रामा ‘ज्युबिली’मध्ये दिसणार आहे. यात तो श्रीकांत रॉयची भूमिका करणार आहे. सध्या यातील कलाकार प्रमोशनमध्ये व्यग्र आहेत. एका मुलाखतीदरम्यान, प्रोसेनजीतने खुलासा केला की सूरज बडजात्याच्या ‘मैने प्यार किया’ मधील सलमान खानच्या मुख्य भूमिकेसाठी आधी त्याची निवड झाली होती.
Video: अंबानी कुटुंबाच्या कार्यक्रमात शाहरुख खानचं गौरीशी जोरदार भांडण? ‘तो’ व्हिडीओ व्हायरल
‘बॉलिवूड बबल’ने त्याला तो चित्रपट न करण्यामागचं कारण विचारलं असता, त्याने त्याबद्दल जास्त माहिती देण्यास नकार दिला. “ते सोडा. विसरून जा. चला ‘ज्युबिली’बद्दल बोलूया,” असं प्रोसेनजीत म्हणाला. “पाहा, प्रामाणिकपणे सांगायचे तर माझा शेवटचा हिंदी चित्रपट ‘शांघाय’ होता आणि तुम्हाला माहिती आहे की गेल्या १० ते १२ वर्षांपासून मी मुख्य प्रवाहातील सिनेमा करत नाही. मी शिफ्ट झालो आहे आणि मी सर्व नवीन दिग्दर्शकांसोबत काम केले आहे,” असंही त्याने सांगितलं. प्रोसेनजीतने आता बोलण्यास नकार दिला असला तरी ‘मैने प्यार किया’ नाकारण्यामागचे खरे कारण काही दिवसांपूर्वीच त्याने सांगितले होते. “मला सलमानच्या आधी त्या चित्रपटासाठी निवडण्यात आलं होतं आणि आजपर्यंत मी बडजात्या आणि भाग्यश्री यांच्या संपर्कात आहे,” असं तो म्हणाला होता.
‘मैंने प्यार किया’ने सलमानला बॉलिवूडमध्ये ओळख मिळवून दिली. हा सुपरहिट चित्रपट नाकारण्याचं कारण सांगत प्रोसेनजीत म्हणाला, “विजयता पंडितसोबतचा अमर संगी हा माझा बंगाली चित्रपट खूप हिट झाला होता. माझ्या तारखा शूटिंगसाठी बूक झाल्या होत्या. मला ‘मैने प्यार किया’ चित्रपट करायला आवडला असता, पण मला ती ऑफर तारखा नसल्याने नाकारावी लागली होती. मी पहलाजजी (पहलाज निहलानी) यांच्यासोबत बंगाली चित्रपट करत होतो, ते त्यावेळचे मोठे निर्माते होते. ते एके दिवशी माझ्याकडे आले आणि म्हणाले, ‘बेटा, माझ्याकडे एका हिंदी चित्रपट आहे, तू तो कर. तू मुंबईचा हिरो आहेस’ आणि त्यांनी मला आंधिया या हिंदी चित्रपटाची ऑफर दिली होती,” अशी आठवण त्यांनी सांगितली.
दरम्यान, ‘ज्युबिलीमध्ये आदिती राव हैदरी, वामिका गब्बी आणि श्वेता बासू प्रसाद यांच्याही भूमिका आहेत.