शाहरुख खानच्या ‘जवान’ चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा आहे. या चित्रपटातील जबरदस्त डायलॉग्स प्रेक्षकांना शिट्ट्या वाजवायला भाग पाडतात. असाच एक डायलॉग यात आहे, जो शाहरुख खानच्या वैयक्तिक आयुष्यावर बेतलेला आहे, असं ट्रेलरनंतर नेटकऱ्यांनी म्हटलं होतं. तो डायलॉग चित्रपटाच्या कथेत नव्हताच, असा खुलासा आता लेखकाने केला आहे.
‘जवान’च्या एका सीनमध्ये शाहरुख खान ‘बेटे को हाथ लगाने से पहले बाप से बात कर’ असा डायलॉग म्हणताना दिसतो. हा डायलॉग सुरुवातीला स्क्रिप्टचा भाग नव्हता, असं चित्रपटाचे संवाद लेखक सुमीत अरोरा यांनी सांगितलं आहे. ३१ ऑगस्ट रोजी या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला होता. तेव्हा त्यात या डायलॉगने शाहरुखच्या चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले होते. ऑक्टोबर २०२१ मध्ये ड्रग्ज प्रकरणात शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला अटक झाली होती. त्या घटनेशी संबंधित हा डायलॉग असून अधिकारी समीर वानखेडेंसाठीच हा डायलॉग किंग खानने म्हटल्याचं नेटकरी सोशल मीडियावर म्हणत होते. अशातच आता लेखकाने तो डायलॉग स्क्रिप्टमध्ये नव्हता, असं म्हटल्याने चर्चांना उधाण आलं आहे.
‘पठाण’ अन् ‘जवान’च्या यशानंतर शाहरुख खान ‘या’ सहा चित्रपटांमध्ये दिसणार, बायोपिकचाही समावेश
लेखक म्हणाले,”ही एक अशी कथा आहे जी तुम्हाला चित्रपट निर्मितीच्या जादूवर विश्वास ठेवायला भाग पाडेल. तो डायलॉग आमच्या स्क्रिप्टमध्ये नव्हताच. तो ‘क्षण’ जिथे शाहरुख सरांनी हा डायलॉग म्हटला तेव्हा आम्हा सर्वांना माहीत होतं की तो अगदी संवादाशिवायही एक शक्तिशाली क्षण आहे. शूटिंग करताना वाटलं की याठिकाणी एक डायलॉग असावा.”
तो डायलॉग वेळेवर सुचला होता, असं अरोरांनी सांगितलं. “मी तिथे सेटवर होतो म्हणून मला बोलावण्यात आले आणि परिस्थिती पाहता माझ्या तोंडून पहिले शब्द निघाले, ‘बेटे को हाथ लगाने से पहले, बाप से बात कर’. हा डायलॉग त्याठिकाणी अगदी चपखल बसला. दिग्दर्शक अॅटली आणि शाहरुख सर दोघांनाही तो आवडला आणि शॉट पूर्ण झाला. शाहरुख सरांनी ज्याप्रकारे तो डायलॉग म्हटला, तो ऐकून आम्हाला आम्हाला आनंद झाला. पण ती लाइन इतकी हिट होईल आणि लोकांना इतकी आवडेल असं आम्हाला कधीच वाटलं नव्हतं. लेखक म्हणून तुम्ही फक्त एक ओळ लिहू शकता पण तिचे नशीब पुढे तिच लिहू शकते,” असं सुमीत अरोरा म्हणाले.