Bhagam Bhag Sequel : अक्षय कुमार, गोविंदा आणि परेश रावल या कलाकारांच्या मुख्य भूमिका असलेला ‘भागम भाग’ या चित्रपटाचा सिक्वेल प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. २००६ मध्ये प्रदर्शित झालेल्या या कॉमेडी चित्रपटाने प्रेक्षकांना पोट धरून हसायला लावले होते. आता या ब्लॉकबस्टर चित्रपटाचा अधिकृत सिक्वेल ‘भागम भाग २’ लवकरच प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज होत आहे. हास्याचा तडका आणि मनोरंजनाचा धुमाकूळ पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
१८ वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या या सुपरहिट कॉमेडी चित्रपटच्या सिक्वेलची अधिकृत घोषणा निर्मात्यांनी केली आहे. गेल्या काही काळापासून या चित्रपटाच्या सिक्वेलबाबत चर्चा सुरू होती. आता ‘भागम भाग २’ चे पटकथालेखन सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.
‘भागम भाग २’ च्या हक्कांचे हस्तांतरण ‘शेमारू एंटरटेन्मेंट’कडून ‘रोअरिंग रिव्हर प्रॉडक्शन’च्या सरिता अश्विन वर्दे यांच्याकडे करण्यात आले आहे. सरिता या चित्रपटाच्या पटकथेवरदेखील काम करत असून त्या शेमारूच्या सहकार्याने चित्रपटाची निर्मिती करणार आहेत. या घोषणेबाबत ‘द हॉलीवूड रिपोर्टर’शी बोलताना सरिता म्हणाल्या, ‘भागम भाग’सारख्या चित्रपटाचा सिक्वेल यायला हवा असं मला वाटत होतं. योग्य वेळेची वाट पहात आम्ही हा निर्णय घेतला आणि आता हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज आहे.”
शेमारू एंटरटेन्मेंटचे सीईओ हिरण गडा यांनीही या सिनेमाबद्दल आनंद व्यक्त केला. ते म्हणाले, “या चित्रपटाने प्रेक्षकांचं ज्याप्रकारे मनोरंजन केलं, त्याच पद्धतीने सिनेमाच्या नव्या भागातूनही प्रेक्षकांचं मनोरंजन व्हावं यासाठी आम्ही एका उत्कृष्ट टीमबरोबर काम करत आहोत ‘भागम भाग २’ हा आधीच्या भागापेक्षा अधिक ‘मॅड, क्रेझी आणि मजेशीर’असेल.”
हेही वाचा…‘या’ कारणामुळे शाहरुख खान सोडणार होता बॉलीवूड; दिल्लीला जाण्याची तयारी करत पकडलं होतं विमान, पण…
२०२५ च्या मध्यावर या सिनेमाचे प्रोडक्शनचे काम सुरू होईल असे बोलले जात आहे. या चित्रपटात अक्षय कुमार, गोविंदा आणि परेश रावल यांची लोकप्रिय पात्रे पुन्हा एकत्र पाहायला मिळण्याची शक्यता आहे. ‘भागम भाग’चं दिग्दर्शन करणारे प्रियदर्शन सिक्वेलसाठी परत येणार का? याबाबत कोणतीही पुष्टी झालेली नाही. मात्र, ‘भागम भाग’च्या चाहत्यांसाठी हा सिक्वेल निश्चितच एक आनंदाची बातमी ठरणार आहे.