अभिनेत्री भाग्यश्री बॉलिवूडची अशी एक अभिनेत्री आहे जिने पहिल्याच चित्रपटातून चाहत्यांची मनं जिंकली. राजघराण्यातून आलेल्या भाग्यश्रीसाठी चित्रपटांमध्ये काम करण्यासाठी घरच्यांची परवानगी मिळवणं सोपी गोष्ट अजिबात नव्हती. २३ फेब्रुवारी १९६९ मध्ये सांगलीचे राजा विजयसिंहराव पटवर्धन यांच्या घरात तिचा जन्म झाला होता. आज भाग्यश्रीचा ५४ वा वाढदिवस. भाग्यश्रीला पहिला चित्रपट मिळाला तो सलमान खानबरोबर आणि तिने पदार्पणातच कमाल केली. सलमान खानच्या ‘मैंने प्यार किया’ने भाग्यश्रीला एका रात्रीत सुपरस्टार बनवलं. पण भाग्यश्रीच्या आधी सूरज बडजात्या यांच्या मनात या चित्रपटासाठी वेगळ्याच अभिनेत्रीचं नाव होतं.
सलमान खानचा पहिला सुपरहिट चित्रपट होता ‘मैंने प्यार किया’. या चित्रपटाचं दिग्दर्शन सूरज बडजात्या यांनी केलं होतं. या चित्रपटात सलमानच्या अभिनयाने तर लोकांची मनं जिंकलीच पण त्याचबरोबर भाग्यश्रीच्या निरागस चेहरा प्रेक्षकांच्या जास्तच पसंतीस उतरला होता. या जोडीचा पहिलाच चित्रपट हिट झाला तेव्हा सर्वांच्या तोंडी या दोघांचंच नाव होतं. आजही जेव्ही बेस्ट ऑनस्क्रीन बॉलिवूड कपलबद्दल बोललं जातं तेव्हा सर्वात आधी सलमान-भाग्यश्रीचं नाव घेतलं जातं. पण या चित्रपटासाठी भाग्यश्रीला दिग्दर्शक सूरज बडजात्या यांची पहिली पसंती नव्हती.
आणखी वाचा- “तिने माझ्यासाठी सीनमध्ये…”, भूमी पेडणेकरबद्दल रणवीर सिंगचा मोठा खुलासा
आपल्या पहिल्या चित्रपटाचं दिग्दर्शन करताना त्यात सर्वकाही बेस्ट असावं अशी सूरज बडजात्या यांची इच्छा होती. पहिल्यांदा त्यांना स्क्रिप्ट आवडली नाही त्यामुळे त्यांच्या म्हणण्यानुसार दुसरी कथा लिहिण्यात आली. वडिलांच्या आग्रहामुळे ते रोमँटिक चित्रपट करण्यास तयार झाले होते. त्यांनी सलमान खानला अभिनेता म्हणून निवडलं होतं. पण अभिनेत्रीचा शोध सुरू होता. त्यासाठी ते स्वतः अॅक्टिंग स्कूलमध्ये जात असत. अखेर त्यांनी ठरवलं की या चित्रपटासाठी ते अभिनेत्री निलम यांना कास्ट करतील.
आणखी वाचा- “मैंने प्यार किया चित्रपटानंतर अनेक महिने मी बेरोजगार होतो कारण…”, सलमान खानने केला खुलासा
सूरज बडजात्या यांना ‘मैंने प्यार किया’साठी निलम अभिनेत्री म्हणून हव्या होत्या मात्र त्यांच्याशी बोलणं होत नव्हतं. कारण त्यावेळी त्या सनी देओलबरोबर चेन्नईमध्ये एका चित्रपटाचं शूटिंग करत होत्य. अशात सूरज बडजात्यांनी ठरवलं की ते निलम यांना भेटण्यासाठी जातील आणि त्यासाठी त्यांनी तिकिटही बुक केलं. पण चेन्नईसाठी फ्लाइट टेकऑफ करण्याआधी त्यांना वडिलांचा कॉल आला आणि त्यांनी सूरज यांना थांबण्यास सांगितलं.
सूरज बडजात्या यांच्या वडिलांना त्यांना सांगितलं की थोडं आणखी थांब कारण त्यांनी एका मासिकात एका मुलीचा फोटो पाहिला होता आणि त्यांनी त्या मुलीचा फोटो सूरज यांना पाठवला. ती मुलगी होती भाग्यश्री पटवर्धन. फोटो पाहताच सूरज बडजात्या यांना भाग्यश्री त्यांच्या चित्रपटाची अभिनेत्री म्हणून आवडली. त्यानंतर त्यांनी भाग्यश्रीची ऑडिशन घेतली आणि या भूमिकेसाठी तिची निवड करण्यात आली.