सूरज बडजात्या यांच्या ‘मैंने प्यार किया'(Maine Pyar Kiya) या चित्रपटातून भाग्यश्री(Bhagyashree)ने पदार्पण केले. १९८९ साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांचे भरपूर प्रेम मिळाले. आजही हा सिनेमा प्रेक्षकांना खिळवून ठेवतो. त्यामध्ये अभिनेता सलमान खान(Salman Khan) व भाग्यश्री हे प्रमुख भूमिकांत दिसले होते. त्यांच्यातील ऑनस्क्रीन केमिस्ट्रीने प्रेक्षकांना वेड लावले होते. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत भाग्यश्रीने चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान तिच्यात व सलमान खानमध्ये घट्ट मैत्री झाल्याचे म्हटले. याचदरम्यान सलमान खानला अभिनेत्रीची हिमालय दासानीबरोबरची लव्ह स्टोरी माहीत झाली होती. भाग्यश्रीला सुरुवातीला वाटले की, सलमान खान तिच्याबरोबर फ्लर्ट करीत आहे; मात्र नंतर तो तिला तिच्या बॉयफ्रेंड हिमालय दासानीवरून चिडवत असल्याची जाणीव झाली. मैंने प्यार किया या चित्रपटानंतर भाग्यश्री व हिमालय यांनी काही काळातच लग्न केले होते.
त्याने माझ्या कानात गाणे….
कोव्हिड गुप्ता फिल्म्स (Kovid Gupta Films) या यूट्यूब चॅनेलला दिलेल्या एका मुलाखतीत, दिल दिवाना या गाण्याच्या शूटिंगदरम्यान सलमान तिला कशा प्रकारे चिडवत होता याबरोबरच सलमान खानचे वागणे अचानक का बदलले याबद्दल अभिनेत्रीला आश्चर्य वाटल्याचे तिने सांगितले. भाग्यश्रीने, “सलमान आला आणि माझ्याजवळ बसला. त्याने माझ्या कानात गाणे म्हणायला सुरुवात केली. तो सेटवर नेहमी सभ्यपणे वागत असे. माझ्याशी खूप चांगले वागत असे. तो अचानक असे का वागत होता, ते मला समजले नाही. तो फ्लर्ट करत आहे, त्याची सीमा ओलांडत आहे, असे मला वाटले. मी त्याला विचारले की, तू असे का करत आहेस? तो सेटवर माझ्या मागे फिरत होता आणि गाणे म्हणत होता. मी विचारले की, नक्की काय झाले आहे? अखेर त्याने मला बाजूला घेतले आणि म्हटले की, मला माहीत आहे तू कोणाच्या प्रेमात आहेस ते. त्यावर, मी त्याला तुला काय माहीत आहे, असे विचारताच सलमानने हिमालयचे नाव घेतले. तो मला म्हणाला की, मला हिमालयबद्दल माहीत आहे. तू त्याला इथे का बोलावत नाहीस? त्याचे बोलणे ऐकल्यानंतर मला आश्चर्य वाटले, असे होऊ शकत नाही, हा विचार मी करत होते”, अशी आठवण सांगितली आहे.
याबद्दल अधिक बोलताना अभिनेत्रीने म्हटले, “या घटनेनंतर माझी व सलमानची मैत्री घट्ट झाली. तो माझा असा जवळचा मित्र झाला की, ज्याला सगळे माहीत होते. त्याला सगळे सीक्रेट्स माहीत होते. जेव्हा मी व हिमालयने लग्न केले, त्यावेळी सलमान व सूरजजी बडजात्या हे माझ्या बाजूने हजर होते. कारण- माझे कुटुंब माझ्या लग्नाला आले नव्हते.”
भाग्यश्री व हिमालय यांनी १९९० मध्ये लग्न केले. त्यांना अभिमन्यू व अवंतिका अशी दोन मुले आहेत. दोघेही अभिनय श्रेत्रात काम करीत आहेत.